
नवीदिल्ली- विश्वचषकाच्या १३ व्या सामन्यात अफगाणिस्तानने डिफेन्डिंग चॅम्पियन इंग्लंडचा दारूण पराभव केला आहे. वर्ल्ड कपमधील हा पहिला उलटफेर ठरला आहे. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने इंग्लंडच्या गोलंदाजांना चोप दिला आणि २८४ धावा स्कोरबोर्डवर लावल्या. त्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संघ पत्त्यासारखा कोसळला. इंग्लंडला २१५ धावांपर्यंत मजल मारता आली. व ६९ धावांनी हार पत्करावी लागली. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रेहमान याने ३ विकेट घेतल्या. तर रहमानउल्ला गुरबाज याने ८० धावांची धमाकेदार खेळी केली. तर इंग्लंडकडून हॅरी ब्रुक याने सर्वाधिक ६६ धावा केल्या.

अफगाणिस्तानने दिलेल्या २८५ धावांचं आव्हान पार करताना इंग्लंडची सुरूवात खराब झाली. जॉनी बेअरस्टो आणि जो रूट लवकर बाद झाले. त्यानंतर सलामीवीर डेविड मलान आणि हॅरी ब्रूक यांनी इंग्लंडला सावरलं. मात्र, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स आणि जॉस बटलर हे तगडे फलंदाज सपशेल फेल ठरले. अखेर आदिल रशिदने २० धावा केल्या अन् इंग्लंडच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानची सुरूवात चांगली झाली. सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी वर्ल्ड कपमधील ११४ धावांची विक्रमी भागेदारी केली. त्यामुळे इंग्लंडला घाम फुटला होता. आदिल रशिदच्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडने अफगाणिस्तानचा डाव गुंडाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, इकराम अलीखिल याने एक बाजू आवळून धरली. त्याने ५८ धावांची संयमी खेळी केली तर रशीद खान आणि मुजीब उर रहमान यांनी त्याला साथ देत अफगाणिस्तानची धावगती वाढवली. अखेर अफगाणिस्तानने ४९.५ ओव्हरमध्ये २८४ धावा केल्या. अफगाणिस्तानची टीम ऑलआऊट झाली होती.