नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी मायक्रोसॉफ्टने भारतात क्लाऊड आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी तीन अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, कंपनी २०३० पर्यंत देशातील एक कोटी तरुणांना ‘एआय’चे प्रशिक्षण देणार आहे.
मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि सीईओ सत्या नाडेला यांनी ही घोषणा केली. भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्रचंड वेगाने वाढत आहे, असेही नाडेला यावेळी म्हणाले. नडेला सध्या भारत दौऱ्यावर आहेत.
नाडेला म्हणाले की, मायक्रोसॉफ्ट कंपनीच्यावतीने भारतात आम्ही आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या विस्ताराचे नियोजन करीत आहोत. याचा मला खूप आनंद वाटत आहे.
काय आहे ‘ॲझ्युअर’ ?..
मायक्रोसॉफ्ट ‘ॲड्युअर’ पूर्वी विंडोज ॲझ्युअर म्हणून ओळखले जात होते. हा मायक्रोसॉफ्टचा सार्वजनिक क्लाऊड कॉम्प्युटिंग प्लॅटफॉर्म आहे. याद्वारे क्लाऊड सेवा क्षेत्रात सेवा देणे शक्य होते.
यात कम्प्युटिंग, ॲनालिटिक्स, स्टोअरेज आणि नेटवर्किंग आदींचा समावेश आहे. युजर्स या सेवांमधून निवड करून नवीन ॲप्लिकेशन्स विकसित करू शकतात तसेच सार्वजनिक क्लाऊडवर आपल्या ॲप्लिकेशन्स चालवू शकतात.
आम्ही ‘ॲझ्युअर’ क्षमता वाढवण्यासाठी तीन अब्ज अमेरिकी डॉलर्सचा अतिरिक्त निधी गुंतवत आहोत. कंपनी भारतात प्रादेशिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर विस्तार करणार आहे, असे यावेळी नाडेला यांनी सांगितले.
मायक्रोसॉफ्टच्या ॲडव्हांटेज इंडिया प्रोग्रामने आता २०२३ पर्यंत २ कोटी भारतीयांना AI कौशल्यांमध्ये प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या उपक्रमांतर्गत मायक्रोसॉफ्टने २४ लाख भारतीयांना प्रशिक्षण दिले आहे. त्यापैकी ६५ टक्के महिला आणि ७४ टक्के लहान शहरांतील होत्या. हा उपक्रम भारतातील तरुणांना एआय क्षेत्रात रोजगारासाठी तयार करत आहे.
“कंपनीचा उद्देश देशातील प्रतिभेला प्रोत्साहन देणे, हा आहे. येथील तरुणांना कंपनीच्या माध्यमातून आम्ही अपार संधी उपलब्ध करून देणार आहोत. याचा त्यांना पुरेपूर लाभ उठवता येईल, याकडे लक्ष पुरविले जाणार आहे. यासाठी प्रत्यक्ष सुरुवात करताना आम्ही फारच उत्साहित आहोत. आम्ही २०३० पर्यंत एक कोटी तरुण- तरुणींना ‘एआय’चे प्रशिक्षण देणार आहोत असे सत्या नाडेला, अध्यक्ष आणि सीईओ, मायकोसॉफ्ट यांनी सांगितले .