
पुणे- उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. त्याचा परिणाम राज्यात देखील पाहायला मिळत आहे. राज्यातही अनेक भागात तापमानाचा पार घसरला आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, चंडीगड, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये कडक्याची थंडी आहे. थंडीसोबत धुक्याचाही कहर दिसत आहे. मात्र राज्याातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून चढ उतार दिसत आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. त्यामुळे दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता तो कायम आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव परिसरात पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे तूर, कांदा, हरभरा पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला होता.