
*रत्नागिरी : अंमली पदार्थ विरोधी कस्टम, उत्पादन शुल्क, कोस्ट गार्ड, पोलीस आदींनी समुद्र किनारी गस्त घालून तपासणी करावी. जेट्टींवर येणाऱ्या परदेशी नौकांवर तपासणी करावी. व्यसनमुक्ती केंद्राचा प्रस्ताव करा, असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले.*
नार्को कोओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज झाली. बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॕ अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, उत्पादन शुल्क अधिक्षक कीर्ती शेडगे, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी विभागनिहाय सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी. अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करुन, अहवाल सादर करावा. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी बंद असणाऱ्या कंपन्यांबाबत तपासणी करुन अहवाल द्यावा. अन्न व औषध विभागाने रात्रीच्या वेळी सुरु असणाऱ्या मेडिकल दुकानाना भेट देऊन तपासणी अहवाल सादर करावा. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असणारे तडीपारीचे प्रस्ताव प्राधान्याने मार्गी लावावेत. सर्व विभागांनी गंभीरपणे अंमली पदार्थ विरोधी मोहीम हाती घेवून कार्यवाही करावी.

पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले, नेपाळी खलाशांमध्ये अंमली पदार्थांचा वापर होतो, त्यामध्ये बंदर अधिकाऱ्यांनी दक्ष राहून तपासणी करावी. पोलीस विभागाकडील श्वान त्यासाठी घ्यावा. त्याबाबत पोलीसांना कळवावे. कस्टम विभागाने बंदरांवर येणाऱ्या नौका विशेषतः परदेशी त्यावरील साहित्यांची तपासणी करावी. पोलीस विभागाला माहिती देऊन संयुक्त कारवाई करावी. 24 तास सुरु असणाऱ्या मेडिकल दुकानांबाबतही एफडीएने लक्ष ठेवावे. पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी विषय वाचन करुन माहिती दिली.
क्षेत्रीयस्तरावरील अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे साहभागी झाले होते.