देवरुख- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील माटे-भोजने सभागृहात आज शुक्रवारी सायंकाळी ६ वा. पुणे येथील नटसम्राट कुमार आहेर यांचा ‘मी सत्यशोधक महात्मा ज्योतीराव फुले बोलतोय’ हा गाजलेला प्रबोधनात्मक एकपात्री प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित सामाजिक कार्यकर्ते आर्ते यांनी हा एकपात्री प्रयोगाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. देश विदेशात २ हजार पेक्षा जास्त प्रयोग झालेला, चोखंदळ कार्यकर्त्यांनी प्रचंड उदो उदो केलेला, बुरसटलेले विचार बदलायला लावणारा महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा महाराज यांचे जळजळीत पुरोगामी विचार नटसम्राट कुमार आहेर हे आजच्या एकपात्री प्रयोगाद्वारे मांडणार आहेत. चळवळीतील कार्यकर्त्यांनी आवर्जून पहावा असा हा नावाजलेला एकपात्री प्रयोग आहे. याबाबत अधिक माहितीसाठी युयुत्सू आर्ते- 9422351926 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.