
रत्नागिरी, दि. 15 : माविम आणि शालेय शिक्षण विभाग यांच्यात झालेल्या करारानुसार बचत गटांच्या महिलांना शालेय गणवेशाचे कापड कटिंग करुन पुरविण्यात येणार आहे. त्याच्या शिवणकामासाठी 110 रुपये मिळणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात 2 लाख विद्यार्थी असतात. त्यासाठी ‘माविम’ने शिवणकाम केंद्रांवर अधिक भर द्यावा, असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) लोकसंचालित साधन केंद्र खेड, नवतेजस्विनी तालुकास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी माजी जि.प. सदस्य अजय बिरवटकर, माजी बांधकाम सभापती अरुण कदम, चेतन विसपुते, बाबाजी जाधव, समीक्षा कदम, कीर्ती पुजारी, साधना बोथरे आदी उपस्थित होते.





महिला व बाल विकास मंत्री कु. तटकरे म्हणाल्या, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत अधिकाधिक महिलांपर्यंत पोहचून लाभ देणे हा उद्देश आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी शासन पाऊले उचलत आहे. महिला दिनाला चौथे महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे. महिलांचे सक्षमीकरण, समानता देणे, उद्योगात वाव देणे, बचतगट चळवळ सक्षम करणे, आधुनिक सुविधा देणे, शिक्षणाला प्राधान्य, सुरक्षितता अशा अष्टसुत्रीवर या धोरणात भर देण्यात आला आहे. बचत गटांच्या वस्तू पाठविण्याबाबत पोस्ट खात्याबरोबर करार करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांनी मार्केटींगवर भर देताना पोस्टाच्या सुविधाचा लाभ घ्यावा, असेही त्या म्हणाल्या.
माविमचे जिल्हा समन्वयक अंबरीश मिस्त्री यांनी स्वागत प्रस्ताविकाचा सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमास बचतगटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांनी उभारलेल्या प्रदर्शन स्टॉल कु. तटकरे यांनी भेट दिली.