
मुंबई ,01 नोव्हेंबर- जनशक्तीचा दबाव- राज्यभरात सध्या मराठा आरक्षणाचा वणवा पेटला आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या घरावर दगडफेक आणि जाळपोळ केल्याच्या घटना घडला. मराठा आरक्षणाप्रकरणी आता आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. आकाशवाणी आमदार निवास येथे उभी असलेल्या मुश्रीफांच्या गाडीवर काही अज्ञात लोकांकडून दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
आज सकाळी 7-7:30च्या दरम्यान ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. यावेळी हसन मुश्रीफ यांची गाडी आकाशवाणी आमदार निवास येथे उभी असताना काही मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी हेरुन गाडीवर हल्ला केला. हा हल्ला ज्यावेळी झाला तेव्हा त्याठिकाणी तिथे पोलीस उपस्थित होते. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ आक्रमक मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर याठिकाणी आणखी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तर मराठा आंदोलनामुळे अनेक नेते, मंत्री, आमदारांच्या बंगल्याबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेत आंदोलन सुरू असतानाच राज्यात काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने आंदोलकांनी आमदार, लोकप्रतिनिधींची निवासस्थानं, तसंच शासकीय कार्यालयांना लक्ष्य केल्याने परिस्थिती चिघळू लागली आहे.

