अहमदनगर :- राज्यातील अडीच कोटी मराठा बांधव ओबीसीमध्ये समाविष्ट होणार आहेत, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ते म्हणाले की, ५४ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. त्यांना आधी कुणबी प्रमाणपत्र द्या, त्यानंतर त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्र मिळायलाच हवे. सरसकट आरक्षणावर आम्ही ठाम आहोत.
लाखो मराठ्यांसह पायी मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील यांचे अहमदनगरमध्ये (बाराबाभळी) जंगी स्वागत करण्यात आले. बाराबाभळी येथील मदरसाच्या दीडशे एकर मैदानावर आंदोलकांच्या मुक्कामाची सोय करण्यात आली होती.जरांगे यांचे रात्री साडेबाराच्या सुमारास मैदानावर आगमन झाले. फटाक्यांची आतषबाजी, तसेच जेसीबीतून पुष्पवृष्टी करीत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, ‘‘एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज एक झाला आहे. मराठा कधी एक होत नाहीत, असा टोमणा मारला जात होता. पण मराठा एक झाला आहे.”
”मराठा एक होऊ नये, यासाठी अनेकजण देव पाण्यात ठेवून बसले होते. पण पाठबळ कसे उभे करायचे हे मराठ्यांनी दाखवून दिले आहे. ही एकजूट तुटू देऊ नका. मी सरकारला मॅनेज होत नाही व फुटतही नाही, हीच सरकारची मोठी अडचण आहे. सात महिन्यांचा वेळ दिला, तरी आरक्षणाचा निर्णय होत नाही. सरकारने काही दगाफटका केला तरी हे आंदोलन सुरूच राहणार आहे. आतापर्यंत ५४ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. त्या सर्वांना कुणबी प्रमाणपत्र द्या, त्यानंतर त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबीचे प्रमाणपत्र द्या,’’ अशी मागणी जरांगे यांनी केली.
जरांगे पाटलांनी आपल्या भाषणात ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांना चांगलेच चिमटे घेतले. भुजबळांचा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध आहे. त्यावर जरांगे म्हणाले, ‘‘५४ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. प्रत्येक घरातील पाच जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल, म्हणजेच सुमारे अडीच कोटी मराठे आता ओबीसीत जाणार आहेत .’’
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील मराठा आंदोलनाला विरोध करत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या.मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर बुधवारी (ता.२४) सुनावणी होणार आहे.
जरांगे पाटील हे शुक्रवारी (ता.२६) मुंबईत पोहोचणार असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. आंदोलनादरम्यान पंढरपूर येथे एका विकलांग तरुणाने आत्महत्या केली; मात्र तो तरुण माळी समाजाचा असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ही आत्महत्या नाही तर मराठा समाजाच्या आंदोलकांनी केलेली हत्या आहे, असा दावा सदावर्ते यांनी याचिकेत केला आहे.
जाहिरात