नांदेडमधील नायगाव तालुक्यातील शेतकरी किशोर जुन्ने यांनी सीताफळ शेतीतून लाखोंची कमाई केली आहे. त्यांनी यासोबत पेरु आणि मोसंबीची देखील लागवड केली आहे.
नांदेड: माळरानावर फळबाग फुलवण्याचा प्रयोग शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. अनेक शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेतात फळबागांचा प्रयोग करत आहेत. त्यात त्यांना यश मिळत असून चांगल्या प्रकारे उत्पन्न देखील मिळत आहे. जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कोकलेगाव येथील किशन जुन्ने या शेतकऱ्याने केलेला यशस्वी प्रयोग सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. किशन जुन्ने यांनी माळरानावरील पडीक असलेल्या तीन एकर वर सीताफळाची बाग फुलवली आहे.
किशन जुन्ने हे बारावी उत्तीर्ण शेतकरी आहेत. नोकरीच्या मागे न लागता पडीक जमिनीवर शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार २०१९ मध्ये त्यांनी तीन एकरमध्ये बालानगरी जातीच्या सीताफळाची बाग उभी केली. सीताफळाची प्रति रोपे ६० रुपये प्रमाणे १८०० झाडे रोपवाटिकेतून त्यांनी विकत घेतले. गांडूळ खत आणि शेणखत या सेंद्रीय खताचा वापर करून ठिबक ने पाणी दिले. योग्य नियोजनामुळे त्यांना पहिल्या वर्षी एक लाख ६० हजार रुपयाचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर दरवर्षी उत्पन्नाचा हा आकडा वाढत राहिला. आता किशन जुन्ने यांना सीताफळाच्या या हंगामात तीन ते चार लाखाचं उत्पन्न मिळत आहे.
तीन एकरच्या या सीताफळाच्या बागेतून ६०० कॅरेट सीताफळाचे उत्पादन निघत असल्याची माहिती किसन जुन्ने यांनी दिली. सीताफळासोबत त्यांनी या १२ फुटांच्या अंतरावर मोसंबी, पेरूची लागवड देखील केली आहे. त्यातून ही त्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
सीताफळांना आंधप्रदेश आणि तेलगंणा राज्यात मागणी
नायगावच्या किसन जुन्ने यांच्या सीताफळाला आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यात मोठी मागणी होतं आहे. तेथील व्यापारी थेट शेतात येऊन सीताफळे खरेदी करत आहेत. अशीच शेती इतर शेतकऱ्यांनी केली तर कोणी ही शेतकरी आत्महत्या करणार नाही. शेतकऱ्यांनी केवळ जिद्द आणि मेहनतीने शेतीचा प्रयोग केला पाहिजे अशी प्रतिक्रिया शेतकरी किशन जुन्ने यांनी दिली आहे.