*वायनाड /केरळ/ प्रतिनिधी-* केरळच्या वायनाडमध्ये पावसानं हाहाकार केला आणि दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळं काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं. गावं आणि गावकरी ढिगाऱ्याखाली आले आणि 200 हून अधिक मृत्यू झाले. बचावकार्यातही अनेक अडचणी येत होत्या. याच अडचणींवर मात करण्यासाठी बांधलेल्या पुलामुळं एका लष्करी अधिकाऱ्यांची सध्या मोठी चर्चा होत आहे. या अधिकारी म्हणजे मराठमोळ्या सीता शेळके.
वायनाडच्या दुर्घटनेनंतरच्या बचावकार्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सीता शेळके या महिला लष्करी अधिकारी आहेत. मूळच्या महाराष्ट्रातील असलेल्या मेजर सीता शेळकेंना सोशल मीडियावर मोठा सन्मान मिळताना दिसत आहे. चुराल्लमाला ते मुंदाक्काई या दोन गावांना जोडणारा पूल पावसानं वाहून गेला होता. त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपाचा लोखंडी पूल लष्करानं सीता शेळके यांच्या नेतृत्वात विक्रमी वेळेत तयार केला.
सीता शेळके यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडिया यूझर त्यांचं ‘वाघीण’ म्हणत कौतुक करत आहेत.
या मेजर सीता शेळके नेमक्या कोण आहेत? त्यांनी कशा प्रकारे हे काम पूर्ण केलं, हे आपण जाणून घेणार आहेत.
*वायनाडची दुर्घटना-*
केरळच्या वायनाडमध्ये 30 जुलैच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसाने होत्याचं नव्हतं करून टाकलं. दरड कोसळून अनेकांची घरदारं, कुटुंब ढिगाऱ्याखाली दबली गेली. निसर्गाच्या कोपामुळं चुराल्लमाला, मेप्पडी आणि मुंदाक्काईमधील नागरिक प्रचंड धक्क्यात होते. तशाच स्थितीत ते अनेक तास प्रियजनांना शोधत होते. दुर्घटनेतील मृतांचा आकडा 215 वर गेला असून 250 हून अधिक लोक अद्याप बेपत्ता असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. तसंच, मृतांची संख्या वाढण्याचीही भीती आहे. बचावपथकं अजूनही बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत.
चुराल्लमाला, मुंदाक्काई आणि मेप्पडी ही गावं वायनाड जिल्ह्यात आहेत. याठिकाणी डोंगररांगांतून निघणारा पाण्याचा प्रवाह चुराल्लमालामधून पुढं सरकत इरुवंचीपुळा नदीला जाऊन मिळतो. 30 जुलै आणि त्यापूर्वी काही दिवस झालेल्या जोरदार पावसामुळं नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली.त्यानंतर नदीनं 30 तारखेला जणू मुंदाक्काई हे गावच गिळंकृत केलं. याच गावाला सर्वांत आधी भूस्खलनाचा फटका बसला.
या सर्वानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आलं. पण मदतकार्यात एक मोठा अडथळा निर्माण झाला होता. तो म्हणजे, चुराल्लमाला ते मुंदाक्काई दरम्यान असलेला पूल पावसात वाहून गेला होता.पूलच नसल्यामुळं मदतकार्यासाठी लागणारी उपकरणं, साहित्य आणि मदत साहित्य नेणंही शक्य होत नव्हतं. त्यामुळं याठिकाणी तातडीनं एक पूल उभारणं गरजेचं होतं.
तातडीची गरज असल्यानं अखेर लष्कराच्या जवानांनी याठिकाणी बेली ब्रिज (तात्पुरता लोखंडी पूल) उभारला. हा पूल तयार झाल्यानंतरच रुग्णवाहिकेसह इतर उपकरणं व वाहनांना घटनास्थळापर्यंत पोहोचणं शक्य झालं आणि बचावकार्याला गती मिळाली. या पुलाच्या उभारणीची जबाबदारी असलेल्या तुकडीचं नेतृत्व करत होत्या, मराठी लष्करी अधिकारी मेजर सीता शेळके.
*कोण आहेत मेजर सीता शेळके?..*
मूळच्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील गाडीलगावच्या असलेल्या सीता शेळके या लष्करात दाखल झाल्या. चेन्नई ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (OTA) मधून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं.ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी ही भारतीय सैन्याची प्रशिक्षण संस्था आहे जी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) साठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देते.या अंतर्गत, लष्करी वैद्यकीय पथक वगळता सैन्याच्या सर्व शाखांसाठी 49 आठवड्यांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम तयार केला जातो.
मेजर सीता शेळके या बेंगळुरूमधील लष्कराच्या मद्रास अभियांत्रिकी गटातील (MEG) 70 सदस्यीय संघातील एकमेव महिला अधिकारी आहेत.त्यांच्या देखरेखीत सैन्य दलाच्या पथकाद्वारे बेली ब्रिजचे बांधकाम 31 तासांच्या अथक प्रयत्नाने विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आलं.दरम्यान, मेजर शेळकेंचा नव्याने बांधलेल्या पुलावर उभा असतानाचा फोटो शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर त्यांचं नाव चर्चेत आलं.मेजर शेळके या त्यांच्या पथकातील एकमेव महिला अधिकारी असून त्यांनी बजावलेल्या कामगिरीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.सीता शेळके यांचं मूळगाव अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गाळीलगाव आहे, सध्या त्यांचे आईवडील टाकळी ढोकेश्वर या गावात राहतात, सीता यांचे वडील अशोक शेळके हे तालुक्यातील नामवंत वकील आहेत, सीता या 3 बहिणी आहेत.
*‘मद्रास सॅपर्स’ आणि त्यांचे कार्य-*
मद्रास इंजिनीअर ग्रुप (MEG) ला ‘मद्रास सॅपर्स’ या नावानेही ओळखलं जातं. हे एक अभियांत्रिकी युनिट असून हा ग्रुप सैन्यासाठी रस्ते तयार करणे, रस्त्यांतील अडथळे दूर करणे, पूल बांधणे आणि युद्धकाळात लँडमाइन्स शोधण्यात आणि ते निकामी करण्यात निष्णात आहे. नैसर्गिक आपत्तींच्या वेळी बचावकार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. 2018 साली केरळमध्ये आलेल्या पुरात या पथकाने विशेष कामगिरी बजावली.
*बेली ब्रिजची उभारणी-*
या ब्रिजचं बांधकाम 31 जुलैच्या रात्री सुरू करण्यात आलं आणि 1 ऑगस्टला संध्याकाळी 5 पर्यंत हा ब्रिज तयार झाला.19 स्टील पॅनेल वापरून बनवलेल्या हा पूल सिंगल पिलरच्या आधारे उभा करण्यात आला आहे.ब्रिजच्या परीक्षणासाठी लष्कराने आधी त्यांच्या वाहनाद्वारे यावरून वाहतूक करून त्याची चाचणी घेतली. त्यानंतर तो इतरांनाही वापरण्यासाठी खुला करण्यात आला. हा ब्रिज वायनाड जिल्ह्यातील चुराल्लमाला व मुंदाक्काई या सर्वाधिक नुकसान झालेल्या भागांना जोडण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला.
*सैन्याचा भाग असल्याचा अभिमान – शेळके…*
बचावकार्यादरम्यान सीता शेळके यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लष्करी अधिकारी असल्याचा अभिमान व्यक्त केला.“मी या ग्रुपमधील एकमेव महिला अधिकारी आहे, असं म्हणण्यापेक्षा मी एक भारतीय जवान असून भारतीय सैन्य दलाची प्रतिनिधी आहे,” असं त्या म्हणाल्या.
त्या पुढं म्हणाल्या की, मला या मोहिमेचा भाग होता आलं याचा मला अभिमान आहे. याचं श्रेय मी माझ्या वरिष्ठांना देते व माझ्या सहकाऱ्यांना देते.
वरिष्ठांचं मार्गदर्शन आणि सहाकाऱ्यांंचं धाडस या जोरावर आम्ही वेगानं काम करत हे यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो, असंही त्यांनी म्हटलं.या पुलाच्या उभारणीच्या कामात करणाऱ्या विविध संस्था, शासकीय संस्था तसंच मदत करणाऱ्या प्रत्येकाचे मेजर सीता शेळके यांनी आभारही मानले.
*अनेकांकडून कौतुकाची थाप..*
आसाम रायफल्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल विकास लाखेरा यांनी ट्विट करत, कठीण परिस्थितीत जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडणाऱ्या मेजर सीता शेळके यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
नागालँडमध्ये आसाम रायफल्स ट्रेनिंग सेंटर अँड स्कूल त्या प्रशिक्षकही होत्या असं त्यांनी सांगितलं आहे.
काँग्रेसचे आमदार रमेश चेन्निथला यांनीही ट्विट करत मेजर सीता शेळके यांचं कौतुक केलं. ते म्हणाले, “धन्यवाद, मेजर सीता शेळके, दुर्घटनाग्रस्त वायनाड येथे बेली ब्रिजच्या बांधकामाचे नेतृत्व करून अनेकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढत त्यांचा जीव वाचवला. त्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक साहसी व्यक्तिमत्त्व आहे.” या व्यतिरिक्त अनेकांनी समाजमाध्यमांवर व्यक्त होत मेजर सीता शेळके यांच्या कार्याचं कौतुक केलंय. एका युजरने ट्विट करत म्हटलं, “मेजर सीता शेळके आणि इंजिनियर रेजिमेंटचा अभिमान वाटतोय. वायनाडमध्ये 24 तासांत बेली ब्रिज बांधून युद्धपातळीवर बचतकार्य सुरू केले, हे अविश्वसनिय आहे. तर, स्थानिक माध्यमांनाकडून त्यांचा ‘वाघीण’ असा उल्लेख करत त्यांच्या कार्याचं कौतुक केलंय.