सेऊल- दक्षिण कोरियात मोठा विमान अपघात झाला. यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जेजू एअरलाइन्सचे हे विमान लँडिंगदरम्यान धावपट्टीवर घसरले आणि अपघातग्रस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. या विमानात एकूण 181 प्रवासी असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते.
दक्षिण कोरियातील एका वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे. दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान धावपट्टीवरून घसरले आणि क्रॅश झाले, ज्यामध्ये 23 जण जखमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेजू एअरचे हे विमान थायलंडहून परतत होते. दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर उतरताना विमान घसरले आणि भिंतीवर आदळले. भिंतीवर आदळताच विमानाने पेट घेतला. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 28 जणांचा मृत्यू झाला आहे.
स्थानिक अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, जेजू एअरचे प्रवासी विमान मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरले. विमानात अचानक स्फोट झाला अन् आग लागली. त्यामुळे लँडिंगवेळी विमानात घसरले अन् दुर्घटना घडली. मुआन अग्निशमन विभागाचे अधिकारी ली सेओंग-सिल यांनी सांगितले की, आतापर्यंत दुर्घटनाग्रस्त विमानातून २८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अग्निशामन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आणखी मृताचा शोध घेतला जात आहे.