मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर आज महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. मात्र, या आंदोलनस्थळावर खासदार नारायण राणे आणि निलेश राणे आल्यानं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे उबाठा आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. या राड्यानंतर नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत एकमेकांवर टीका केली.
सिंधुदुर्ग- राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानं महाविकास आघाडीच्या वतीनं आज मोर्चा काढण्यात आला. मात्र यावेळी राणे पितापुत्र ही दाखल झाल्याने आंदोलन स्थळी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. आदित्य ठाकरे आणि नारायण राणे यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की ही झाली. मात्र पोलिसांनी ही परिस्थिती ताबडतोब नियंत्रणात आणली.
राजकोट किल्ल्यावर राणे समर्थक आणि ठाकरे गटात तुफान राडा
राजकोट किल्ल्यावर उबाठा गट आणि राणे समर्थकांमध्ये राडा : मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीनं आज निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आणि संबंधितांचे राजीनामे मागत हे आंदोलन करण्यात आलं.
खासदार नारायण राणे आणि निलेश राणे आंदोलनस्थळी-
आंदोलन स्थळावर महाविकास आघाडीचे नेते भेट देत होते. यावेळी खासदार नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे सुद्धा पुतळा कोसळल्याच्या ठिकाणी पाहणीसाठी दाखल झाले. मात्र आदित्य ठाकरे यांचे कार्यकर्ते आणि निलेश राणे यांचे समर्थक समोरासमोर आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी आणि एकमेकांच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाली. मात्र आमदार वैभव नाईक आणि आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना घोषणाबाजी न करण्याच्या आणि शांत राहण्याच्या सूचना केल्या. पोलिसांनी ही धक्काबुक्की नियंत्रणात आणण्याचा तातडीनं प्रयत्न केला. काही वेळातच हा प्रकार थांबला. त्यानंतर नारायण राणे आणि विजय वडेट्टीवार यांनी मात्र परस्परांना हात मिळवत भेट घेतली.
आदित्य ठाकरे यांचा आंदोलनस्थळी ठिय्या-
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “या सरकारनं आतापर्यंत अनेक गोष्टींमध्ये भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळेच या गोष्टी घडत आहेत. बदलापूरमध्ये झालेला अत्याचार असेल किंवा छत्रपती शिवरायांचा कोसळलेला पुतळा असेल, ही यांच्या भ्रष्टाचाराची उदाहरणं आहेत. सरकार आता स्वतःवरची जबाबदारी झटकून नौदलावर जबाबदारी ढकलत आहे, हे अत्यंत घाणेरडे राजकारण आहे. त्यामुळे या सरकारनं आता तरी लाज बाळगावी.” मात्र यावेळी राणे समर्थकांकडून करण्यात आलेल्या घोषणाबाजीबद्दल त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
उद्धव ठाकरेंची राणेंवर टीका-
“सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा हा राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराचा कळस आहे. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत, भ्रष्टाचार वाढत आहे. त्यातच सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीकडून पाहणी दौरा आणि त्यानंतर निषेध आंदोलन करण्यात आलं. मात्र, तिथं मोदी शाहांचे दलाल आणि शिवद्रोही आडवे आले. महाराष्ट्र या शिवद्रोह्यांना धडा शिकवेल,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंसह राज्य सरकारवर प्रहार केला.
राणेंची ठाकरेंवर टीका-
याप्रसंगी खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून ठार मारण्याची उघड धमकीसुद्धा दिली. यावरून वातावरण चांगलंच तापलंय. यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली.