ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे (Rajan Vikhare) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आल्यानं ठाण्यात महाविकास आघाडीची वज्रमूठ पाहायला मिळाली.
शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल…
राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भर उन्हात कार्यकर्त्यांची गर्दी झाल्यानं हे ठाणेकरांचं प्रेम असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेना आणि ठाण्याचं जुनं नातं आहे. ही लढाई पक्ष आणि बाप चोरणाऱ्या, संविधान बदलणाऱ्या आणि महाराष्ट्राला दिल्लीमध्ये झुकवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. त्यावेळी शिवसेना, युवासेना सचिव वरूण सरदेसाई, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेसचे अध्यक्ष ठाणे जिल्हा विक्रांत चव्हाण, महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिल्लीश्वर म्हणतात मुख्यमंत्री तुम्हीच लढा :
राजन विचारे यांच्यासमोर कोणीच लढण्यास तयार नाही. त्यामुळं कोणाला उमेदवारी द्यायची हा मोठा प्रश्न पडला असताना, मुख्यमंत्री तुम्हीच लढा असं दिल्लीश्वरानाचं म्हणणं असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. तसेच ही विजयाची रॅली असल्याचं विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला.
मोठी वाहतूक कोंडी…
सकाळपासूनच राजन विचारे यांनी कोपीनेश्वर मंदिर आनंद दिघे स्मृतीस्थळ मुख्य मार्केट मार्गावरुन ठाकरे गटानं शक्तिप्रदर्शन केलं. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. राजन विचारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर चिंतामणी चौकामध्ये एक छोटेखानी सभा देखील झाली. या संपूर्ण कार्यक्रमामुळं परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.