
शिवपुराणात देवांचे देव महादेवाची पूजा करण्यासाठी काही तिथी विशेष मानल्या गेल्या आहेत. यापैकी एक म्हणजे महाशिवरात्री. महाशिवरात्री हा हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. पंचांगानुसार महाशिवरात्रीचा हा शुभ सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिवशंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता.
यावेळी १८ फेब्रुवारी रोजी हा उत्सव साजरा केला जात आहे. या दिवशी महाशिवरात्रीचे व्रत केल्यास सौभाग्य आणि समृद्धी लाभते, असे म्हटले जाते. या दिवशी भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे भक्त उपवास करतात आणि पूजा करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी रुद्राभिषेक देखील केला जातो. मात्र रुद्राभिषेक करताना काही चुका टाळाव्यात. अन्यथा, उपासनेचे अशुभ परिणाम मिळू शकतात. जाणून घेऊया त्या चुका…
शास्त्रानुसार असे सांगितले आहे की, शिवलिंगाचा रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करताना पूर्व दिशेला उभे राहू नये. तसेच पश्चिम दिशेला उभे असताना भगवान शंकराला जल अर्पण करू नये, कारण देवाची पाठ पश्चिम दिशेला आहे. म्हणूनच या दिशेला उभे राहून जलाभिषेक केल्याने शुभ फळ मिळत नाही.
शिवलिंगाला जल अर्पण करताना दक्षिण दिशेलाच उभे राहावे. कारण असे केल्याने तुमचे तोंड उत्तर दिशेकडे असेल आणि उत्तर दिशा ही देवतांची दिशा मानली जाते.
शिवलिंगाला जल अर्पण करण्यासाठी पितळ, चांदी आणि पितळेची भांडी वापरणे शुभ असते. पण लक्षात ठेवा की शिवलिंगावर जल अर्पण करण्यासाठी तांबे, स्टील इत्यादींचा कधीही वापर करू नये.
शिवलिंगावर कधीही जलद जलाभिषेक करू नये. जल अर्पण करताना शिव मंत्रांचा जप सावकाश करावा. शास्त्रानुसार शिवलिंगाला जल अर्पण करताना तुळशीच्या पानांचा कधीही वापर करू नये, कारण भगवान शंकराला तुळशी अर्पण करणे वर्ज्य आहे.
शिवलिंगावर जल अर्पण केल्यानंतर परिक्रमा करू नये, कारण शिवलिंगावर अर्पण केलेले जल पवित्र होते. अशा स्थितीत ते पाणी ओलांडणे अशुभ आहे. म्हणूनच आजूबाजूला गेलात तरी जिथून पाणी वाहत आहे तिथून मागे वळा.