महादेव जानकर यांचा पक्ष महायुतीबरोबर येणार का? यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. मागील काही दिवसांपासून जानकर यांची विधानं महायुतीविरोधात असल्याचं जाणवलं. त्यामुळं ते महायुतीबरोबर येणार का? हा प्रश्नच होता. मात्र, रविवारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत जानकर यांची बैठक झाली. त्यानंतर “मी महायुतीबरोबरच आहे,” असा निर्धार जानकर यांनी केलाय.
मुंबई : मनसे महायुतीत येण्याची शक्यता दाट असताना, आता महादेव जानकर यांची ‘रासप’ देखील महायुतीत सहभागी झालीय. रविवारी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत ‘रासप’चा महायुतीतील सहभाग आणि जागा वाटपाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि महायुतीचे समन्वयक प्रसाद लाडही उपस्थित होते.
जानकरांना १ जागा मिळणार :
या बैठकीत महादेव जानकर यांनी आपण महायुतीबरोबर राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थानं विकास झालाय आणि त्यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, त्यामुळं आपण मोदी यांच्यासोबत आहोत. महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तिनिशी सोबत राहू,” असंही महादेव जानकर यांनी यावेळी सांगितलं. तसेच या बैठकीत महादेव जानकर यांच्या ‘रासप’ला लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आलाय. दरम्यान, ही जागा परभणीची मिळू शकते, असं बोललं जातंय.
माझ्यावर दबाव नाही :
महायुतीच्या बैठकीला महादेव जानकरी यांची उपस्थिती होती. महादेव जानकर यांच्या ‘रासप’ला एक जागा देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय. महादेव जानकर यांना परभणीची जागा मिळण्याची शक्यता आहे. महादेव जानकर महायुतीतच राहणार असल्याची माहिती, माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे यांनी दिलीय. दरम्यान, “मी महायुतीत येण्यासाठी माझ्यावर बिलकुल दबाव नाही. मी आधीही महायुतीबरोबरच होतो आणि आताही राहणार आहे,” असं प्रसारमाध्यमांशी बोलताना महादेव जानकर यांनी सांगितलं.
पवार माझ्यासाठी ‘पॉलिटिकल युनिव्हर्सिटी’ :
पुढे बोलतान जानकर म्हणाले की, “मी शरद पवार यांचे जाहीर आभार मानतो. शरद पवार यांना मी ‘पॉलिटिकल युनिव्हर्सिटी’ म्हणून पाहतो. मी त्यांना माझ्या वडीलांप्रमाणे मानतो. ते मला माढा येथील एक जागा देण्यावर तयार होते. आमची चर्चा झाली, त्यामुळं त्यांचं पुन्हा एकदा जाहीर आभार मानतो. आज माझी आणि महायुतीतील प्रमुख तीन नेत्यांची बैठक झाली. बैठकीत ‘रासप’ला एक जागा देण्यावर निर्णय झाला. आता तीन प्रमुख नेते विचार करून कुठली एक जागा देणार ते एक-दोन दिवसात कळेल. जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल, तसंच मी जरी निवडणूक लढवली तरी रासपच्या चिन्हावरच निवडणूक लढवेन,” असं यावेळी महादेव जानकर यांनी सांगितलं.