विधानसभा निवडणुकीआधी महायुतीला खिंडार:राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार, महादेव जानकर यांची मोठी घोषणा..

Spread the love

मुंबई- विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महायुतीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या रुपाने महायुतीमधून पहिला मित्रपक्ष बाहेर पडला आहे. महायुतीमधून बाहेर पडल्यानंतर महादेव जानकर यांचा पक्ष स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. जातीय समीकरणांचा विचार करता भाजपला महादेव जानकर यांची मनधरणी करण्यात यश येते का? ते पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. आमदारकीची टर्म पुन्हा न मिळाल्यामुळे देखील नाराज असल्याचे बोलले जात होते. याशिवाय जानकर यांनी आपल्या पक्षासाठी महायुतीकडे 40 ते 50 जागांची मागणी केली होती. मात्र त्यांना महायुतीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीला रामराम ठोकल्यानंतर महादेव जानकर यांचा पक्ष किती जागांवर उमेदवार उभे करणार तसेच भाजप आणि महायुतीकडून त्यांची नाराजी दूर केली जाणार की नाही, हे पहावे लागणार आहे.

काय म्हणाले महादेव जानकर?..

दरम्यान, मी कुणावर नाराज नाही. महायुतीवरही नाही आणि महाविकास आघाडीवरही नाही. आमचा पक्ष देशात मोठा झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही स्वतंत्र लढणार असल्याचे महादेव जानकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. काँग्रेस आणि भाजपच्या लायकीत राष्ट्रीय समाज पक्ष आला पाहिजे. आमची ताकद आम्ही आमजमावणार आहोत. आम्ही सर्वच्या सर्व 288 जागा लढवणार असल्याचेही जानकर यांनी सांगितले. महायुतीसोबत असताना त्यांनी आम्हाला लोकसभेची एक जागा दिली होती, अभिनंदन. आता आम्हाला आम्ही ताकद बघायची आहे.

लोकसभेला झाला होता पराभव


लोकसभा निवडणुकीतही महायुतीने महादेव जानकर यांना एक जागा सोडली होती. जानकर यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. लोकसभा निवडणुकीवेळीही महादेव जानकर महाविकासआघाडीसोबत जायच्या तयारीत होते, यासाठी त्यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चाही सुरू होती, पण शेवटच्या क्षणी महादेव जानकर यांनी महायुतीसोबत जायचा निर्णय घेतला होता.

जानकरांची मोठी ताकद-

महादेव जानकर यांना धनगर समाजाचा मोठा पाठिंबा आहे. महादेव जानकर यांच्या पक्षाची सोलापूर, बारामती, परभणी, बीड, जालना आणि कर्नाटक लगतच्या प्रदेशात मोठी ताकद आहे. धनगर समाजाची संख्या जास्त असलेल्या मतदारसंघात महादेव जानकरांच्या पक्षाला चांगला पाठिंबा आहे. त्यामुळे जानकर यांनी महायुतीला सोडचिठ्ठी देणे हे महायुतीसाठी डोकेदुखी ठरु शकते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page