*जालना-* मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या माध्यमातून राज्याच्या राजकीय पटलावर स्वतःच्या ताकदीचा ठसा उमटवणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत. यासाठी राज्यभरातून त्यांच्याकडे 800 हून अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज आलेत. यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या आंतरवाली सराटीत मराठा समाजाच्या इच्छुक उमेदवारांची तोबा गर्दी झाली आहे.
288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात निवडणूक होत आहे. त्यानंतर 23 तारखेला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी एका मराठी वृत्तपत्राशी बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याकडे 800 हून अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती दिली आहे.
*800 इच्छुकांचे अर्ज दाखल*
इच्छुक उमेदवारांशी मी उद्यापासून संवाद साधेल. त्यानंतर 20 ऑक्टोबर रोजी निवडणूक लढवायची की सत्ताधाऱ्यांचे आमदार पाडायचे याबाबतचा निर्णय घेतला जाईल. तूर्त आमच्याकडे 800 हून अधिक इच्छुकांचे इर्ज प्राप्त झालेत, अशी माहिती मनोज जरांगे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. उल्लेखनीय बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण लोकसभा निवडणुकीत भाजपची हाराकिरी झाल्यामुळे ते आपल्या निर्णयावर फेरविचार करत आहेत.
ही इच्छुक राजकीय मंडळी पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये परतण्याच्या दिशेने विचार करत आहेत. विशेषतः या नेत्यांनी उमेदवारीच्या आशेने जरांगे यांच्या आंतरवाली सराटीतही गर्दी केली आहे. शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर मराठवाड्यातील अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, ज्ञानेश्वर चौगुले, बालाजी कल्याणकर, संतोष बांगर, प्राध्यापक रमेश बोरनारे, तानाजी सावंत या 9 आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्विकारले. त्यामुळे या आमदारांच्या मतदारसंघांत पक्षसंघटना मजबूत करण्यासह नवे उमेदवार उभे करण्यावर उद्धव ठाकरे यांना जोर द्यावा लागणार आहे.
त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी पैठनमध्ये राष्ट्रवादीतून दत्ता गोर्डे, पैठण येथीली संत एकनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष सचिन घायाळ, औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात विद्यमान आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात राजू शिंदे, वैजापूरमध्ये प्रा. बोरनारे यांच्याविरोधात दिनेश परदेशी यांना पक्षात प्रवेश दिला आहे. यापूर्वी या मतदारसंघात भाऊसाहेब चिकटगावकर ठाकरे गटात प्रवेश केला होता. पण परदेशी यांच्या प्रवेशामुळे त्यांनी पुन्हा ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली. सिल्लोडमध्ये मात्र अद्याप उद्धव ठाकरे यांना अद्याप नवा भिडू मिळवता आला नाही. दुसरीकडे, निवडणुकीच्या तोंडावर बीड, परभणी, धाराशिव, लातूर, जालना या मतदारसंघातून शरद पवारांना भेटून येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.
*विधानसभेला लोकसभेहून दुप्पट ताकद दाखवणार -जरांगे*
मनोज जरांगे यांनी मंगळवारी महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवण्याचे संकेत दिले होते. सत्ता असल्यामुळे आरक्षण देणे सरकारच्या हातात होते. आता विधानसभेचे मतदान आमच्या हातात आहे. तुम्हाला सत्तेत येऊ द्यायचे की नाही हे आमच्या हातात आहे. सरकारने कोणतीही मागणी नसताना 15 जातींचा ओबीसींमध्ये समावेश केला. पण मराठा समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत होते की मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करायचा असेल तर महाविकास आघाडीकडून तसे लिहून घ्या. आता 15 जाती ओबीसींमध्ये घेतल्या तेव्हा त्यांनी तसे लिहून घेतले होते का? आपण लोकसभेच्या वेळी जेवढी ताकद दाखविली होती, त्याच्या दुप्पट विधानसभेच्या निवडणुकीत दाखवू, असे मनोज जरांगे महायुतीला इशारा देताना म्हणाले होते.