🛑 जनशक्तीचा दबाव न्यूज.
🛑 नवी दिल्ली | जानेवारी २९, २०२३.
▪️ मराठी भाषेला मिळालेली समृद्ध संपदा वाढवूया तसेच अधिकाधिक उत्तम दर्जाचे साहित्य मराठी भाषेत निर्माण करूया, असे प्रतिपादन राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे सदस्य तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले. महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने ‘आर्याबाग’ या वर्षारंभ विशेषांकाच्या प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
▪️ डाॅ. ज्ञानेश्वर मुळे पुढे म्हणाले, महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा समृद्ध असा इतिहास आहे. मराठी भाषा ही भावनांसह लोककला, साहित्य, लोकगीते, लोकनाट्य या सर्वांची संवाहक अशी ही भाषा आहे. मराठी भाषेत गेल्या 1500 वर्षात अनेक महाग्रंथ, दीर्घ कविता, खंडकाव्य निर्माण झालेले आहेत. तर अलीकडच्या काळात कांदबरी, कथा, लोककथा, निबंध अशा प्रकारचे विपुल साहित्य मराठीत निर्माण झाले आहे.
▪️ महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेसह महाराष्ट्राबाहेरील मूळ मराठी मातीशी जुळलेली २ कोटी जनताही मराठीत बोलते ही अभिमानाची बाब आहे. वैविध्यपूर्ण भाषा हे भारताचे वैशिष्ट्य आहे. जसे आपण जैववैविध्य जपतो तसेच आपल्याला भाषा वैविध्यही जपता आले पाहिजे. आज तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे इतर भाषेचा प्रभाव वाढत चाललेला आहे. आपली साहित्याची समृद्ध परंपरा जर टिकवायची असेल तर या साहित्य संपदेला पुढे नेऊया, यात अधिकाधिक दर्जेदार साहित्य निर्माण करू या, दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्र शासन राबवित असलेल्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ सारख्या उपक्रमात जास्तीत जास्त मराठी लोकांनी भाग घेतला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी ‘आर्याबाग’ या अंकात त्यांनी लिहिलेल्या कवितेचे वाचन याप्रसंगी केले.