
*मुंबई-* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी गुढीपाडवा मेळाव्यातून विविध विषयांवर हात घातला. औरंगजेबच्या कबरीबाबत काय करावे? याची रोखठोक सूचना मांडली. औरंगजेबची कबर उखडून टाकण्यापेक्षा त्या ठिकाणी काय करावे म्हणजे इतिहास आम्हाला आणि येणाऱ्या नवीन पिढीला समजेल, त्याबाबत राज ठाकरे यांनी विचार मांडले. त्या ठिकाणी फक्त एक बोर्ड लावण्याची सूचना राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरे यांनी आजच्या गुढीपाडव्याच्या सभेत विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवावी का? या मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडली. “छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर खरंतर औरंगजेबाने आग्र्याला परत जायला होतं. पण असं झालं नाही. तो इथे का थांबला? एवढ्या मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा, शहनशाह एका अडीच, साडेतीन-चार जिल्ह्याच्या राजासाठी इथे ठाण मांडून का बसला? त्याला माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आहे, पण का ठाण मांडून बसला होता? शिवाजी महाराज तर गेले होते, त्याला शिवाजी महाराजांचा विचार मारायचा होता. जो त्याला जमला नाही. सगळे प्रयत्न केले, इथे शेवटी मेला. जगाच्या इतिहासात औरंगजेब वाचला जातो. त्याचा अभ्यास केला जातो. ज्यावेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळी जगभरातील लोकांना कळतं की, तो काय करायला गेला होता आणि कसा मेला? तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं जगभरात नाव येतं”, असं राज ठाकरे म्हणाले.
जी कबर आहे ना, ती सजवलेली काढून टाका. तिथे एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेलाय. हा आमचा इतिहास”, अशी महत्त्वाची भूमिका राज ठाकरे यांनी यावेळी मांडली. “अफजल खान ज्यावेळेला इथे आला, इतिहास कशासाठी वाचायचा? इतिहासातून बोध घेण्यासाठी वाचायचा. अफजाल खान इथे आला, प्रतापगडाखाली मारला गेला, तिथेच त्याची कबर खोदली गेली. इथेच त्याला पुरला”, असं राज ठाकरे रोखठोकपणे म्हणाले. मराठीत फार अप्रतिम शब्द आहे ना, पुरुन उरेन ते आहे. अफजल खानाला तिथे पुरला त्याला शिवाजी महाराजांच्या परवानगीशिवाय पुरला नसले. महाराजानी सांगितलं असेल निश्चित करा. जगाला कळू दे कुणाला मारलं आहे. अहो आपण ज्या मराठ्यांनी ज्यांना गाडलं आहे त्यांची प्रतिकं नेस्तनाबूत करुन चालणार नाही. ती जगाला दाखवली पाहिजे की, आम्ही ह्यांना गाडलं आहे”, असं राज ठाकरे म्हणाले.
इस्त्रायलची खूप मोठी संघटना आहे, मोसाद नावाची. त्यांचं एक पुस्तक आहे. त्यातील एक ओळ आहे, आम्ही इस्त्राइलमध्ये अनेक स्मारकं बांधली. पण अनेक लोकांची स्मारकं बांधली नाहीत. कारण ती बांधली तर जगात ते कृत्य आम्ही केलंय असं कळेल. असा विचार ते करतात. आणि आम्ही कुणाला गाडलंय हे आम्ही जगाला दाखवायचं नाही? खरंतर शाळेतील लहान लहान मुलांच्या ट्रीप घेऊन गेल्या पाहिजेत आणि सांगितलं पाहिजे, बाळांनो महाराजांनी याला गाडलं. हा आपल्यावर आला होता, आपल्या धर्मावर उलटला होता, हा आमच्या बहिणींची अब्रू लुटत होता, हा आमची मंदिरं पाडत होता, याला आम्ही गाडला. नाहीतर पुढच्या पिढ्यांना आम्ही काय इतिहास सांगणार आहोत?”, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.