चिपळूण : “वाशिष्ठी डेअरी” चिपळूण आज अनेकांना आधारभूत ठरली. अनेक स्थानिक शेतकरी, युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली, अनेकांच्या संसारात वाशिष्ठीने प्रकाश आणला. पशू पालकांना वेळेवर दुधाचे पैसे मिळतात व चेअरमन प्रशांत यादव यांनी यावर्षी दिवाळीपूर्वीच बोनस दिला आहे. स्थानिक शेतकरी, कष्टकऱ्यांच्या जीवावर वाशिष्ठीची भरभराट सुरू असून कोकणातील या प्रकल्पाचा बोलबाला सुरू आहे. नवनिर्मिती व रोजगाराचे उद्दिष्ट घेऊन बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे याच हेतूने प्रशांत यादव राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची अल्पावधीतच जोरदार चर्चा सुरू झाल्याने काहींना पोटशूळ उठला व त्यांनी स्थानिकांच्या जीवावर उठण्यासाठी वाशिष्ठीच्या पेढ्यांची बदनामी करीत नागरिकांची व ग्राहकांची दिशाभूल सुरू केली आहे. यासाठी वैयक्तिक मेसेज पाठविले जात आहेत.
हा खटाटोप करण्यापेक्षा पेढ्या बाबत जी तक्रार आहे ती वाशिष्ठीच्या व्यवस्थापनाकडे केली असती तर अधिक सोयीचे झाले असते व आम्हाला त्याबाबत योग्य ती दखल घेता आली असती. परंतु एखाद्याला हेतुपुरस्सर षढयंत्र करायचे तर तो कसेही करू शकतो. कारण वाशिष्ठीच्या शापीमध्ये दररोज मालाची काटेकोर तपासणी होते. जुना माल असेल तर तो परत घेतला जातो. आजपर्यंत कोणाचीही साधी तक्रार आलेली नाही, तरी या प्रकल्पाची नाहक कोणी बदनामी करीत असेल तर त्याच्या विरुद्ध रितसर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कारण कोकणात सहकार रुजत नाही. ज्यांनी रुजविण्याचा प्रयत्न केले ते असफल झाले. काहीनी आपले घर भरले. अशावेळी अनंत अडचणीवर मात करीत स्थानिकांना आर्थिक बळ व रोजगार देणारा वाशिष्ठी प्रकल्प सुरु आहे. याचा अभिमान बाळगावा तेवढा थोडाच. राजकारण चार दिवसाचे होऊन जाईल पण स्थानिकांना आपण कायमचे उपाशी ठेवणार आहोत का? आज लोकांना सर्व माहिती आहे त्यामुळे कोणीही दिशाभूल केली तरी लोकच त्याचे उत्तर देतील. आमचा सर्व व्यवहार पारदर्शक असल्याने कोणत्याही चौकशीसाठी सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत असे वाशिष्ठी डेअरीच्या व्यवस्थापनाने सांगितले आहे.