लेझीम, ढोल, पारंपरिक वेशभुषेतील विद्यार्थ्यांच्या ग्रंथ दिंडीने मराठी भाषा गौरव दिनास प्रारंभ , भाषा जगवायची असेल तर तिचा वापर वाढवावा – कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर…

Spread the love

रत्नागिरी : पारंपरिक वेशभुषेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, ढोल, लेझीमच्या संगतीने आज सकाळी ग्रंथ दिंडीने मराठी भाषा गौरव दिन उत्सवास प्रारंभ करण्यात आला. भाषा जगवायची असेल तर दैनंदिन जीवनामध्ये तिचा वापर वाढविला पाहिजे, असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी उद्घाटक म्हणून केले.


महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद, मराठी भाषा समिती आणि रत्नागिरी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून आज मराठी भाषा गौरव दिन आणि कवी कुसमाग्रज जयंती उत्सवाचे येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात उद्घाटन झाले.
     

कार्यक्रमाला कोमसापचे विश्वस्त प्रमुख रमेश कीर, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव मराठी भाषा समिती शुभांगी साठे, पोलीस उपअधिक्षक (गृह) राधिका फडके, मुख्याधिकारी तुषार बाबर, गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ बाबासाहेब परुळेकर, ॲड जया सामंत आदी उपस्थित होते.


    

श्रीमती कीर यांनी केंद्र व राज्य शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल शासनाचे आभार मानले. आज कवी कुसुमाग्रजांची 113 वी जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा केली जाते. आपल्या मराठी साहित्य व वाङमयाची प्राचीन परंपरा आहे. हे साहित्य आपण जतन केले पाहिजे. दैनंदिन व्यवहारात मराठीतून संवाद साधताना आपण संकोच बाळगतो हा न्यूनगंड आपण काढून टाकला पाहिजे. भाषा टिकविण्याची व समृध्द करण्याची आपली जबाबदारी आहे, असे अध्यक्षीय भाषणात श्रीमती कीर यांनी सांगितले. 
   

अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती गायकवाड म्हणाल्या, जनतेसमोर पोलीस खात्याची प्रतिमा अतिशय कठोर असते. वाचन/लेखन यासाठी अनेकदा वेळ कमी मिळतो.  अलिकडच्या काळात मोबाईल व तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पाश्चात्य देशांचे अनुकरण केले जात आहे त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे.  तरुणांमध्ये वाचनाची आवड कमी होत असून, आपली भाषा व संस्कृती जोपासण्याची जबाबदारी आजच्या पिढीने पार पाडली पाहिजे.
    

उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव मराठी भाष समिती श्रीमती साठे यांनी मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी 26 व 27 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. 
निवासी उपजिल्हाधिकारी श्री सूर्यवंशी म्हणाले, ज्ञानेश्वरी, संत तुकाराम महाराजांची गाथा, संत एकनाथ महाराजांचे अभंग, दासबोधातून रामदास स्वामींनी केलेले कथन यातून मराठी भाषेतील उच्च दर्जाची साहित्य निर्मिती दिसून येते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक यांनी आपल्या कार्याने मराठी भाषा जागृत करण्याचे कार्य केले आहे. आज प्रत्येक क्षेत्रात मराठी भाषा व मराठी माणूस अग्रेसर आहे याचा आपण अभिमान बागळला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.


      

यावेळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे शिक्षण घेत असताना लंडनमध्ये मराठी मंडळ स्थापन करणाऱ्या तीर्था उदय सामंत हिचा विशेष गौरव करण्यात आला.  लंडनमध्ये मराठी मंडळ स्थापन करण्याचे मुख्य कारण आपले मराठी भाषेवरील प्रेम आहे. मराठी भाषेची गोडी आई जया सामंत व वडील डॉ. उदय सामंत तसेच शाळेतील मराठी भाषेच्या शिक्षकांमुळे लागली, असे मनोगत व्यक्त करताना तीर्था सामंत हिने सांगितले.
    

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.  यावेळी उपस्थित साहित्यिकांचा मानपत्र देवून गौरव करण्यात आला. 
कार्यक्रमाला लेखक, साहित्यिक, वाचक, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      

ग्रंथदिंडीने उत्साहात प्रारंभ

मराठी भाषा गौरव दिन आणि कवी कुसमाग्रज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचा शुभांरभ आज सकाळी ग्रंथदिंडीने करण्यात आला. येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथून या दिंडीस सुरुवात झाली. पालखीतील ग्रंथांची पूजा करुन दिंडीचा प्रारंभ झाला.
      

लेझीम, ढोल च्या संगतीने आणि पारंपरिक पोशाखातील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सहभागाने ही दिंडी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात आली. तेथे तिची सांगता झाली.
     
यावेळी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव मराठी भाषा समिती शुभांगी साठे, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते.
   
दिंडीमध्ये दामले हायस्कूल, रा.भा.शिर्के प्रशाला, गोदुताई जांभेकर विद्यालय, फाटक हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल या शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page