
कोकणवासीयांनी मागणी केली की दिली जातात अनेक कारणे..बिहारसाठी मात्र शॉर्ट नोटीसद्वारे २० डब्यांची अख्खी गाडी आज धावणार…
रत्नागिरी : वीस वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली कोकणवासियांची हक्काची गाडी पुन्हा दादर येथूनच सोडावी, यासाठी मागील अनेक महिन्यांपासून कोकणवासीय जनता आवाज उठवत असताना त्याकडे लक्ष न देणारे रेल्वे प्रशासन मात्र परप्रांतीयांसाठी पायघड्या घालण्यासाठी तत्पर असल्याचे रेल्वेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
कोकण रेल्वेने सोमवार दि. १० मार्च रोजी एक प्रेस नोट काढून होळीसाठी बिहारची राजधानी पाटण्यापर्यंत धावणारी वीस डब्यांची एलएचबी गाडी जाहीर केली.
आज दिनांक 11 मार्च रोजी ही गाडी वास्को-द-गामा येथून सायंकाळी सुटून मडगाव रत्नागिरी, चिपळूण, पनवेल, कल्याण, भुसावळमार्गे बिहारसाठी रवाना होणार आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ही गाडी दि. 15 मार्च रोजी पाटणा जंक्शनवरून पुन्हा कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी रवाना होणार आहे.
रेल्वेचे धोरण परप्रांतीय धार्जीणे?…
कोकणवासियांकडून मागील अनेक दिवसांपासून दादर रत्नागिरी पॅसेंजरसह काही नव्या गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वेकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अशा वेळी कोकण रेल्वेचा मार्ग कंजस्टेड आहे, नव्या गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळवावी लागेल, दादरमधून कोकणसाठी पॅसेंजर सोडण्यासाठी फलाट उपलब्ध नाही, अशी कारणे दिली जातात. मात्र त्याचवेळी याच महाराष्ट्रातून ते देखील कोकण कोकण रेल्वे मार्गावरून बिहारसाठी अगदी शॉर्ट नोटीसवर विशेष गाड्या सोडण्यासाठी रेल्वेकडे गाड्या आणि मार्ग देखील उपलब्ध आहे. यावरूनच रेल्वेचे धोरण हे कोकणवासीय जनतेसाठी नाही तर परप्रांतीय लोकांसाठी पायघड्या घालणारे आहे की काय असा सवाल निर्माण झाला आहे.