ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षादेखील उतरला आहे. आज अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक अमित सरैय्या यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळेस त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. या निवडणुकीवरून महायुतीमध्ये बेबनाव झाला आहे. शिवसेनेचे संजय मोरे आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे निवडणूक रिंगणात उतरले असताना आता राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अमित सरैय्या यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अमित सरैय्या यांनी गेल्या वर्षभरात सुमारे हजारो मतदारांची नोंदणी केली आहे. या मतदारसंख्येसह महायुतीमध्ये फुट पडल्याचा फायदा सरैय्या यांना मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करायला जाण्यापूर्वी अमित सरैय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “गेले सहा महिने आम्ही मोठ्या संख्येने मतदार नोंदणी केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारले आहे. सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याला प्राधान्यक्रम देऊन आपण काम करणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की यंदा कोकण पदवीधर मतदारसंघात बदल होणार आहे.