
सिंधुदुर्ग- प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोली घाटातील कावळेसाद पॉईंटवर वर्षा पर्यटनासाठी आलेला कोल्हापूर येथील युवक खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेलिंगच्या पलीकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी हा युवक गेला असता, पाय घसरून दरीत पडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याबाबत माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरीत पडलेल्या युवकाचा शोध घेतला जात आहे. वाऱ्यांच्या वेगामुळे उलट्या दिशेने वाहणाऱ्या धबधब्यापाशी हा युवक कोसळल्याची माहिती आहे.
कोल्हापूरमधून एक ग्रुप वर्षा पर्यटनासाठी कोकणात आला होता. त्यावेळी, आंबोली घाटात या पर्यटकांनी आपला गाडी थांबवून निसर्स सौंदर्याचा आनंद लुटला. मात्र, दुर्दैवाने यावेळी एक तरूण रेलिंगच्या पलिकडे जाऊन दरीत कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून या युवकाच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्रांची चौकशी करण्यात येत आहे. युवक नेमकं दरीत कोसळला कसा याबाबत माहिती घेतली जात आहे, पण रेलिंग पलिकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी गेला असता हा अपघात झाल्याचे समजते. दरम्यान, घटनास्थळी दाट धुके आणि मोबाईल टॉवरला रेंज नसल्यामुळे मदतकार्य करताना पोलिसांना अडचणी येत आहेत.