
राजापूर (जि.रत्नागिरी) : देवाचे गोठणे (ता. राजापूर) येथील रावणाचा माळ येथील प्रागैतिहासिक कालीन कातळशिल्पाला राज्य संरक्षित दर्जा देण्यात आला आहे. याबाबत राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने १३ ऑगस्ट रोजी अधिसूचना प्रसिद्ध करून आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत त्यासाठी हरकती वा सूचना मागवल्या आहेत.तालुक्यातील देवाचेगोठणे येथे सर्व्हे नं. १६५/१ या मुकुंद वासुदेव आपटे व गोविंद शंकर आपटे यांच्या जमीन मिळकतीत हे प्रागैतिहासिककालीन कातळशिल्प आढळले आहे. या कातळशिल्पामध्ये एक मनुष्यकृती दर्शवण्यात आली आहे. प्रागैतिहासिक काळातील मानवाने निर्माण केलेली ही कलाकृती व उथळ शिल्प कोरण्यात आले आहे. चुंबकीय विस्थापनाच्या क्षेत्राच्या अस्तित्वामुळे या कातळशिल्पाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे या विभागाने स्पष्ट केले आहे.संरक्षित करावयाच्या जागेचे स्मारकासह एकूण क्षेत्रफळ ८०.०० चौरस मीटर आहे.

राज्यपालांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना जारी करण्यात आली असून, महाराष्ट्रातील प्राचीन स्मारके व पुराण वास्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम १९६० अन्वये ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.या स्मारकात हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीला दोन महिन्यांच्या आत संबंधित स्मारक राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याच्या घोषणेला हरकत घेता येणार आहे. पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने या प्राथमिक अधिसूचनेची प्रत स्मारकाजवळ ठळक ठिकाणी लावण्याची व्यवस्था करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
काय आहे हे कातळशिल्पदेवाचे गोठणे येथे हे कातळशिल्प आहे. या कातळशिल्पांमध्ये आदिमानवाने विविध आकार कोरलेले आहेत आणि ती ४५ हजार वर्षांपूर्वीची असावीत, असा अंदाज आहे. येथे जांभा दगडावर विविध आकार कोरलेले आहेत, जे आदिमानवाच्या कलेचा आणि संस्कृतीचा भाग मानले जातात.
इतिहास उलगडण्यास मदतयेथील कातळशिल्पे ऐतिहासिक आणि पुरातात्त्विकदृष्ट्या महत्त्वाची मानली जातात. ती मानवी वस्ती आणि कलेचा इतिहास उलगडण्यास मदत करणारी आहेत. देवाचे गोठणे येथील कातळशिल्पांमध्ये रावणसड्यावरील कातळशिल्प विशेष प्रसिद्ध आहे. या परिसरात होकायंत्र व्यवस्थित काम करत नसल्याचे दिसले आहे.