कोल्हापुर:- करवीर निवासिनी अंबाबाईच्या किरणोत्सवाला गुरुवारपासून (दि. 9) सुरुवात होत आहे. 9 ते 13 नोव्हेंबर कालावधीत होणारा किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होण्याची शक्यता आहे. मंगळवारी तज्ज्ञांकडून किरणांची तीव्रता तपासण्यात आली.
यावरुन बुधवारीच किरणे पितळी उंबर्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता होती. केवळ ढगाळ वातावरणाचा अडथळा न आल्यास संपूर्ण किरणोत्सव पाच दिवस चालणार आहे.
दक्षिणायण कालखंडातील किरणोत्सव नोव्हेंबर महिन्यात होतो. गुरुवारपासून सुरू होणार्या किरणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विवेकानंद कॉलेजचे प्राध्यापक डॉ. मिलिंद कारंजकर यांनी मंगळवारी मंदिरात पाहणी केली. टेलिस्कोप, इनिमोमीटर, मॅग्नीटोमीटर या उपकरणांच्या मदतीने किरणांचे अंतर, वार्याचा वेग व किरणांशी दिशा तपासण्यात आली.
बुधवारी किरणे पितळी उंबरा ओलांडून गर्भगृहात प्रवेश करतील अशी शक्यता होती. पाहणीवेळी धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नर्लेकर व देवस्थानाचे कर्मचारी उपस्थित होते.