कार्तिक सोमवती अमावस्या 2023 तिथी कार्तिक महिन्यातील अमावास्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यावर्षी कार्तिक अमावस्येला सोमवती अमावस्येचा विशेष योगायोग आहे. या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा करणे आणि दान करणे खूप शुभ मानले जाते. अशा स्थितीत यंदा सोमवती अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजनासह पितरांच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे.
मुंबई /जनशक्तीचा दबाव- पौराणिक ग्रंथांमध्ये कार्तिक महिना भगवान विष्णूचा प्रिय महिना मानला जातो. हिंदू धर्मातील अनेक प्रमुख सण कार्तिक महिन्यात येतात, त्यामुळं हा महिना सर्वात महत्त्वाचा आहे. आज (सोमवार, १३ नोव्हेंबर) कार्तिक महिन्यातील सोमवती अमावस्या आहे. या दिवशी दिवाळीही साजरी केली जात असल्यानं सोमवती अमावस्या फलदायी मानली जाते. ही वर्षातील शेवटची सोमवती अमावस्यादेखील आहे. ही अमावस्या महत्त्वाची आहे. कारण या दिवशी स्नान केल्यानंतर दान केलं जातं. या अमावस्येच्या दिवशी पितरांसाठीही कार्य केलं जातं. त्यांची पूजा केली जाते. या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्यानं अनेक पटींनी फल मिळतं, असा विश्वास आहे. जाणून घेऊया त्याचं महत्त्व आणि आंघोळीचा शुभ काळ कोणता आहे.
सोमवती अमावस्येला स्नान करण्याचा शुभ मुहूर्त :
सोमवती अमावस्या सोमवारी येते या दिवशी विशेषत: पवित्र नदीत स्नान केल्यानंतर काहीतरी दान केल्याने विशेष फळ मिळते. हिंदू कॅलेंडरनुसार, सोमवती अमावस्या 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:44 वाजता सुरू होत आहे. तर ती 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:56 वाजता संपेल. त्याच वेळी, स्नान करण्याचा शुभ मुहूर्त 13 नोव्हेंबरला पहाटे 4:56 ते 5:59 पर्यंत आहे, तर शुभ अभिजीत मुहूर्त 11:40 ते 12:27 पर्यंत असेल.
घरात सुख, समृद्धी आणि शांती राहण्यासाठी करा हे उपाय :
अमावस्येच्या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी कपडे, अन्नपदार्थ किंवा पैसे गरजू लोकांना दान करावेत. असे केल्यानं त्यांच्या घरात सुख-समृद्धी येते. सर्व प्रकारचे रोग व दोष दूर होतात. या दिवशी दान केल्यानं शाश्वत फळ मिळते. या दिवशी एखाद्या व्यक्तीनं कोणत्याही प्रकारचे अन्नदान केल्यास त्याला दीर्घायुष्य लाभते. या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करण्याचा विधी आहे. घरात सुख-समृद्धीसाठी लक्ष्मी माता आणि गणेशाची पूजा केली जाते. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावस्याला सर्वात मोठी अमावस्या म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीच्या दर्शनासाठी येते.