जनशक्तीचा दबाव न्यूज | फेब्रुवारी ०२, २०२३.
देवरूख | निलेश जाधव
मुंबईतील घाटकोपर भटवाडी येथे झालेल्या पालखी नृत्य स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नामांकित पाच संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे येथील श्री देव गांगोबा पालखी नृत्य पथक या संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ही पालखी नृत्य स्पर्धा मनसेचे सुनील शिर्के यांनी दि. ३१ जानेवारी रोजी आयोजित केली होती. या स्पर्धेत जय श्रीमुख मठ बंडबेवाडी ता. लांजा, श्री देव गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळे ता. संगमेश्वर, आई सुकाईदेवी पालखी नृत्य पथक चिंचघरी ता. चिपळूण, चंडिका देवी पालखी नृत्य पथक मळण ता. गुहागर व वाघजाई देवी पालखी नृत्य पथक तनाळी ता. चिपळूण हे संघ सहभागी झाले होते..
या स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील श्री देव गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळे हा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. या संघाने प्रथम देखावा सादर केला. त्यानंतर पालखी नृत्य सादर केले. या संघाला रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. तसेच या संघाला उत्कृष्ट ढोलवादनासाठी आकर्षक चषक देऊन सन्मानीत करण्यात आले. ओंकार बारगुडे याला उत्कृष्ट निशाण नृत्यासाठी आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले.