मुंबई 22 जानेवारी: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. शनिवारी मराठा आंदोलनाचे वादळ मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. हा मोर्चा पायी मुंबईपर्यंत जाणार आहे. २६ जानेवारीपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईत आंदोलनाला बसणार आहेत. राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईसाठी रवाना झाला असून दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अॅक्शनमोडवर आले आहेत. रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रीया दिली. जरांगे यांच्या म्हणण्याप्रमाणेच काम सुरू असून त्यांनी आंदोलन थांबवावे असे आवाहन सीएम शिंदे यांनी केले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे काम सुरू आहे. त्यांनी आंदोलन थांबवले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सरकार राज्यभरात कुणबी नोंदी शोधत आहे, मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. मागासवर्ग आयोग काम करत आहे, समाजाला याचा फायदा होत आहे. जस्टीस शिंदे समितीची लोक राज्यात काम करत आहे. दीड लाख लोक तीन शिफ्टमध्ये काम करत आहे. राज्य सरकार फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण देईल, इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले जाईल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
माझ्याविरोधात चार मंत्र्यांनी ट्रॅप लावला : जरांगे
मी एकटा जरी मुंबईत गेलो तरी राज्यातील करोडो मराठा रस्त्यावर येतील, २५ जानेवारीला आंदोलनाची पुढची दिशा आम्ही ठरवणार आहे. या आंदोलनाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. मला मुंबईत काही झाले तर वर्षानुवर्ष हे आंदोलन सुरू राहील. सरकारमधील चार-पाच मंत्री आमच्याविरोधात ट्रॅप लावत आहेत. त्यांनी आता काही केलं तर लगेच मी नाव जाहीर करणार आहे, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
सरकारने अंतरवली सराटी सारखी चूक त्यांनी करु नये. अन्यथा ही सर्वात मोठी चूक असेल. त्यांना पश्चाताप करायला वेळ मिळणार नाही. त्यांनी आरक्षणात तोडगा काढण्याचे काम करायला पाहिजे. आता पूर्वीचा मराठा राहिलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा आहेत. आम्ही त्यांना वेळ दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे त्यांनी लक्ष घालून आरक्षण द्या. आमच्या नोंदी सापडल्या आहेत. बाकीचे प्रयत्न करायला गेलात तर त्याचे परिणाम वाईट होणार होतील, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.