राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रविवारी दुपारी अनेक गंभीर आरोप करून मुंबईला त्यांच्या सागर बंगल्यावर धडक देण्यासाठी निघालेले मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारची सकाळ उजाडेपर्यंत नरमती भूमिका घेतली
भांबेरी- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रविवारी दुपारी अनेक गंभीर आरोप करून मुंबईला त्यांच्या सागर बंगल्यावर धडक देण्यासाठी निघालेले मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारची सकाळ उजाडेपर्यंत नरमती भूमिका घेतली आहे. रविवारी रात्री भांबेरी गावात मुक्काम केल्यानंतर आज सकाळी ते पुन्हा अंतरवाली सराटी गावात दाखल झाले.
परिस्थिती बघून शहाणपणाची भूमिका…
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना, परिस्थिती बघून शहाणपणाची भूमिका घ्यावी लागेल, एकाही मराठ्याला त्रास झाला नाही पाहिजे. आता सर्व समाज बांधवांनी घराकडे जावे आणि संचारबंदी उठल्यावर अंतरवालीत यावे. आम्ही मुंबईकडे येऊ नये म्हणून संचार बंदी लावली आहे. रात्री मोठया प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त होता. परंतु, आपण रात्रीच त्यांचा असलेला वेगळा प्लॅन उधळून लावला आहे. महाराष्ट्रातील मराठ्यांनी शांततेत आंदोलन करावे, पोलिसांना त्रास देऊ नये, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय त्यांना (फडणवीसांना) सुट्टी नाही, असे म्हणत जरांगे यांनी फडणवीसांना लक्ष्य केलं. आपण संध्याकाळी 5 वाजता निर्णय घेणार आहोत असे स्पष्ट करतानाच त्यांनी समाजबांधवाना घरी परतण्याचे आवाहन केले, तसेच शांततेत धरणे आंदोलन सुरू ठेवा अशी विनंतीही केली.
संचारबंदी आणि धरपकड…
जरांगेंच्या आक्रमक भूमिकेमुळे बीड- सोलापूर- जालना या महामार्गावर तसेच अंबड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज जमा होण्याची शक्यता आहे. यामुळे जालनाचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी मध्यरात्री एक वाजल्यापासून अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागू केली आहे. सदरील संचारबंदी आदेश दुकाने, आस्थापना यांनाही लागू राहतील. कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत, असे आदेशात म्हटले आहे. तसेच, पोलिसांकडून जरांगेंच्या सहकाऱ्यांची धरपकड देखील सुरू झाली आहे. रविवारी रात्री पोलिसांनी जरांगेंच्या सहकाऱ्यांसह एकूण 5 लोकांना ताब्यात घेतले असून यात त्यांचा जवळचा आणि विश्वासू सहकारी श्रीराम कुरणकर याचाही समावेश असल्याचे समजते.
मराठा समाजाला आरक्षण न देण्यामागे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच षड्यंत्र आहे. आपल्यावर सलाईनमधून विषप्रयोग करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून गृहमंत्र्यांना आपले ‘एन्काऊंटर’ करावयाचे आहे, असा गंभीर जरांगेंनी रविवारी फडणवीसांवर केला. त्यानंतर मुंबईकडे, फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे जाण्याची घोषणा करून ते गाडीत बसून निघाले. त्यावेळी गाडीला चहूबाजूंनी मराठा समाजबांधवांचा गराडा होता. 16 दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने आताच मुंबईकडे जावू नये अशी विनंती समाजबांधव त्यांना वारंवार करत होते. पण जरांगे ठाम होते. रस्त्यात त्यांना भोवळही आली. अखेर रात्री भांबेरी गावाजवळ महिला समाजबांधवांसह नारायणगडाच्या महंतांनी विनंती करून त्यांना थांबवले. त्यानंतर सकाळी त्यांनी आपला मुंबईकडे जाण्याचा निर्णय रद्द केला आणि ते अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत.