भारताच्या युवाशक्तीचा विजय; चौथ्या कसोटीसह मालिका जिंकली…

Spread the love

एकेकाळी १२० धावसंख्येवर भारताचे ५ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. इंग्लिश फिरकीपटू भारतासाठी मोठे आव्हान बनले होते, पण गिल आणि जुरेलच्या भागीदारीने इंग्रजांचे मनसुबे उद्ध्वस्त केले.

गिल आणि जुरेल भारताला चौथ्या कसोटीत विजयाकडे घेऊन जाताना…

रांची- भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना सोमवारी रांचीत पार पडला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा ५ विकेट्सनी पराभव करत मालिकेत ३-१ ने अजेय आघाडी घेतली आहे. भारतीय संघाच्या या विजयात शुबमन गिल आणि ध्रुव जुरेलने नाबाद ७२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून मोलाचे योगदान दिले. त्याचबरोबर रविचंद्रन अश्विननेही खारीचा वाटा उचलला.

भारताने कसोटी मालिका जिंकली –

या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने ३५३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी ३०७ धावांवर गारद झाला. अशा प्रकारे इंग्लंडकडे पहिल्या डावाच्या आधारे ४६ धावांची आघाडी होती. यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात १४५ धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे भारतीय संघाने ६१ षटकांत ५ गडी गमावून पार केले. जुरेलच्या बॅटमधून विजयी धावा आल्या. त्याने दोन धावा घेत सामना जिंकवला. जुरेल ३९ धावांवर नाबाद राहिला आणि शुबमन ५२ धावांवर नाबाद राहिला. याशिवाय कर्णधार रोहित शर्माने ५५ धावांची खेळी केली. त्याचबरोबर इंग्लंडकडून शोएब बशीरने पुन्हा एकदा कमाल करत तीन विकेट्स घेतल्या.

टीम इंडियाचे शानदार पुनरागमन –

आज चौथ्या दिवशी भारताने एकही विकेट न गमावता ४० धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. भारताला ८४ धावांवर पहिला धक्का बसला, जेव्हा जो रूटने यशस्वी जैस्वालला जेम्स अँडरसनकरवी झेलबाद केले. त्याला ३७ धावा करता आल्या. त्यानंतर रोहित शर्माही कसोटी कारकिर्दीतील १७ वे अर्धशतक झळकावून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला टॉम हार्टलीने बेन फॉक्सच्या हाती झेलबाद केले. रोहितला ५५ धावा करता आल्या. रजत पाटीदार पुन्हा अपयशी ठरला आणि खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. रवींद्र जडेजाही विशेष काही करू शकला नाही आणि चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page