*मुंबई-* मराठा आरक्षणासाठी अवघ्या राज्याचे रान पेटवणारे मनोज जरांगे पाटील हे आधुनिक मोहम्मद अली जिना असल्याची टीका भाजप आमदार नीतेश राणे यांनी केली आहे. मनोज जरांगे हे आधुनिक मोहम्मद अली जिना आहेत. त्यांच्या आंदोलनामुळे मुस्लिमांचाच जास्त फायदा झाला, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे राज्याचे राजकारण आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधारी महायुती सरकारला जेरीस आणले आहे. सध्या ते पश्चिम महाराष्ट्रातील शांतता रॅलीवर आहेत. त्यांनी शुक्रवारी कोल्हापुरातील रॅलीत भाजपवर सडकून टीका करत आरक्षण देण्याचा पुनरुच्चार केला होता. या पार्श्वभूमीवर नीतेश राणे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
*आंदोलनाचा मुस्लीमांनाच जास्त फायदा…*
मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे एकाही मराठा तरुणाचा फायदा झाला नाही. असा काही फायदा झाला असेल तर त्यांनी आम्हाला त्याचा हिशेब द्यावा. त्यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचा कमी आणि मुस्लीम समाजाचा जास्त फायदा झाला आहे. नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत 90 टक्के मुस्लीम तरुण होते. त्यांना नोकऱ्या लागल्या. त्यामुळे मनोज जरांगे हा आधुनिक मोहम्मद अली जिना तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे, असे नितेश राणे यावेळी बोलताना म्हणाले.
*राणे, दरेकर हे जरांगेंच्या शाळेच्या प्राध्यापक…*
नितेश राणे म्हणाले, नारायण राणे व प्रवीण दरेकर सत्य सांगत आहेत. मराठा समाजाचे प्रबोधन करत आहेत. जरांगे मराठ्यांसाठी लढत आहेत की मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुस्लिमांसाठी लढत आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ते गोधडीत असताना नारायण राणे यांनी आरक्षण मिळवून दाखवले. मनोज जरांगे तुझ्या शाळेत राणे व दरेकर प्राध्यापक होते. मनोज जरांगेच्या दाढीवर आता संशय येत आहे. नक्की तू मराठा आहेस, की आधुनिक महम्मद अली जिना?
*मराठा आंदोलकांना बदनाम करण्याची हिंमत करू नका…*
बीडमध्ये शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाहनावर सुपारी फेकण्यात आली. यावर भाष्य करताना नीतेश राणे म्हणाले की, आंदोलन करायला सांगायचे आणि मग पॅन्ट पिवळी झाली की ते आमचे नाहीत म्हणायचे. हे फक्त राऊत व उद्धव ठाकरे करू शकतात. कोणताही कडवट मराठा असे करणार नाही. राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकणारे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते होते. त्यांनी मराठा आंदोलकांना बदनाम करण्याची हिंमत करू नये, असेही नीतेश राणे यावेळी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले.
दुसरीकडे, मनोज जरांगे यांनीही या प्रकरणी राणे यांच्यावर पलटवार केला आहे. भाजपच्या नेत्यांनी माझ्याविरोधात बोलण्यासाठी टोळ्या तयार केल्या आहेत. सत्तेत असूनही ते आमच्याच माणसांना आमच्याविरोधात उभे करत आहेत. त्यांना पत्रकार परिषदा घेण्यास भाग पाडत आहेत. पण मी अशा टोळ्यांवर बोलणार नाही, असे ते म्हणालेत.
*नारायण राणेंनीही साधला होता निशाणा…*
उल्लेखनीय बाब म्हणजे नीतेश यांचे वडील तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही नुकतीच मनोज जरांगे यांच्यावर टीका केली होती. दाढी वाढवून कुणीही छत्रपती शिवाजी महाराज होत नाही, असे ते म्हणाले. मनोज जरांगे हे कपडे घातले तरी तसेच दिसतात आणि कपडे काढले तरी तसेच दिसतात. आतापर्यंतच्या 400 वर्षांत अनेकांनी दाढी वाढवली. पण त्यापैकी कुणी छत्रपती झाले का? केवळ दाढी वाढवून कुणाला छत्रपती होता नाही. गुणात्मक व्हायला पाहिजे, असे नारायण राणे यांनी जरांगेंवर शरसंदान साधताना म्हटले होते.
त्यानंतर मनोज जरांगेंनीही त्यांच्यावर निशाणा साधला होता. नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मला डिवचण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा मी त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. हे पैशांवर झोपणारे लोक असून, त्यांना सर्वसामान्य लोकांच्या भावना आरक्षणाची किंमत कळणार नाही, असे ते म्हणाले होते