राम मंदिराला ‘अँटी ड्रोन सिस्टिम’चे कवच; ५ किमीपर्यंत शत्रूवर नजर, इस्रायल करणार मदत

Spread the love

अयोध्या :- देशभरातून दररोज सुमारे अडीच लाख भाविक रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत येत आहेत. ही संख्या आगामी काळात वाढू शकते, असा कयास आहे. भाविकांना दर्शनात सुलभता यावी, यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे राम मंदिराच्या सुरक्षेवरही भर देण्यात येत आहे. राम मंदिराच्या सुरक्षेसाठी इस्रायलची ‘अँटी ड्रोन सिस्टिम’ वापरली जाणार आहे. याबाबत जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.
अयोध्येतील राम मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राम मंदिराच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश पोलिसांचे विशेष कमांडो तैनात करण्यात आले आहेत. लवकरच उत्तर प्रदेश पोलिस येथे अँटी ड्रोन यंत्रणा बसवणार आहेत . अयोध्येसह अन्य काही ठिकाणी अँटी ड्रोन यंत्रणा बसवण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश पोलिस इस्रायलकडून अँटी ड्रोन यंत्रणा खरेदी करणार आहेत. त्याची खरेदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा दिनी अँटी ड्रोन प्रणालीचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी ही यंत्रणा एसपीजी आणि एनएसजीकडून तात्पुरत्या वापरासाठी घेतली होती. मात्र, यानंतर आता उत्तर प्रदेश पोलिसांनी ही यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक चाचण्यांनंतर इस्रायलच्या अँटी ड्रोन यंत्रणेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहेत . उत्तर प्रदेश पोलिस १० अँटी ड्रोन यंत्रणा खरेदी करणार आहेत. अयोध्येसह मथुरा, लखनौ आणि वाराणसी यांसारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी ही यंत्रणा बसवली जाणार आहे.
दरम्यान, ही अँटी ड्रोन यंत्रणा ३ ते ५ किमीच्या अंतरातील कोणतेही ड्रोन क्षणात नष्ट करू शकते. या यंत्रणेत कोणतेही ड्रोन ओळखण्याची क्षमता आहे. ही लेझर आधारित प्रणाली आहे जी ड्रोन शोधून नष्ट करू शकते. यामुळे सुरक्षा यंत्रणांना शत्रूच्या ड्रोनची माहिती योग्य वेळी मिळेल आणि योग्य ती कारवाई करता येईल. एवढेच नाही तर, शत्रूचे ड्रोन हॅक करण्याची क्षमताही या प्रणालीमध्ये आहे. या प्रणालीशिवाय, स्नायपर तैनात करण्यात येत आहेत, जे कोणत्याही ड्रोनला लक्ष्य करू शकतात आणि नष्ट करू शकतात.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page