
मुंबई- डीसीपी सुधाकर पठारे यांचा अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पठारे हे नातेवाइकांसोबत ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असताना एका रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. यात दोघांनी आपला जीव गमावला आहे. तेलंगणा तील नगर कुरनूल येथील श्रीशैलम जवळ आज रस्ते अपघातात महाराष्ट्रातील 2011 चे IPS सुधाकर पठारे आणि भागवत खोडके यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे.
डॉ. पठारे हे 2011 सालचे ते आयपीएस आहेत. ते मूळचे वाळवणे (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील रहिवासी आहेत. आयपीएस होण्याअगोदर ते शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये अधिकारी म्हणून राहिले आहेत. डॉ. सुधाकर पठारे यांचे शिक्षण एम.एस्सी. ॲग्री, एलएलबी झालेले आहे. स्पर्धा परीक्षा देत असताना 1995 साली ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले. यानंतर 1996 साली विक्रीकर अधिकारी वर्ग 1 म्हणून त्यांची निवड झाली. 1998 साली पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर पोलिस खात्यातच ते रमले. आतापर्यंत त्यांनी पोलिस उपअधीक्षक म्हणून पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा येथे सेवा बजावली आहे.
अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून चंद्रपूर, वसई तर पोलिस अधीक्षक म्हणून सीआयडी अमरावती येथे सेवा बजावली आहे. पोलिस उपायुक्त म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, नवी मुंबई, ठाणे शहर येथे सेवा बजावली आहे. एसपी डॉ. सुधाकर पठारे यांनी पोलिस खात्यात सेवा बजावताना संघटित गुन्हेगारी (मोक्का), तडीपारी, एमपीडीए अशा प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका लावला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच पोलिस दलात अनेक विविध उपक्रम राबवले आहेत.
कारला एका एसटी बसने धडक दिली
दोघेही इनोव्हा कारने श्रीशैलमला जात असताना, दुपारी 12 च्या सुमारास घाटमार्गावर त्यांच्या कारला एका एसटी बसने धडक दिली. दोघांनीही सीट बेल्ट घातले नव्हते. सुधाकर पठारे यांच्या डोक्याला दुखापत झाली, तर भागवत खोडके यांच्या पायाला आणि अंतर्गत दुखापती झाल्या. त्यांना खासगी रुग्णालयात पोहोचताच दोघांनाही मृत घोषित करण्यात आले. सध्या शवविच्छेदन सुरू आहे.