तपास पतसंस्थेतील चोरीचा; सापडली खोट्या दागिन्यांवर कर्ज घेणारी टोळी..

Spread the love

कोल्हापुरातील सोनारासह चौघांना अटक; तब्बल चार कोटींचे उचलले कर्ज

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील एका पतसंस्थेतील दागिने चोरीचा तपास सुरू असतानाच पतसंस्था आणि बँकांची फसवणूक करणारी टोळीच पोलिसांच्या हाती लागली आहे. या टोळीने सहा संस्थांमध्ये साडेतीनशे तोळे नकली सोने ठेवून सुमारे चार कोटींचे कर्ज उचलल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कोल्हापुरातील सोनारासह चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी

▪️ठोठावण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने कोल्हापूर येथील सोनार अमोल पोतदार (रा. शिवाजीपेठ, कोल्हापूर) यांच्यासह त्यांचे साथीदार योगेश पांडुरंग सुर्वे (रा. तुळसुंदे, राजापूर), अमेय पाथरे (रा. पावस, रत्नागिरी) व प्रभात नार्वेकर (रा. कोल्हापूर) या चौघांना अटक केली आहे. राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील श्रमिक पतपेढीतून २०० तोळे सोने चोरल्याच्या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरु होता. रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून हा तपास सुरु असताना खोट्या दागिन्यांद्वारे कर्ज घेणाऱ्या रॅकेटचा सुगावा लागला. त्यानंतर एकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर सारा प्रकार समोर आला. खोट्या सोन्याद्वारे अनेक पतसंस्था आणि बँकांची फसवणूक करून कर्ज प्रकरणे केल्याचे तपासात पुढे आले. पोलिस या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यानंतर हे एक मोठे रॅकेट असल्याचे पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

🔹️कोल्हापूरचा सोनार द्यायचा सोन्याचा मुलामा

▪️कोल्हापूर येथील सोनाराकडे जाऊन नकली दागिन्यांना सोन्याचा मुलामा दिला जात होता. बँका किंवा पतसंस्थेचे सोनार, दागिना दगडावर घासून भिगाने तपासून घेतात. त्यामुळे स्थानिक सोनारांच्या ते लक्षात आले नाही. त्याचा फायदा उठवत गेल्या वर्षभरात या टोळीने पतसंस्था, बँकांची फसवणूक केली.

🔹️यांना फसविले

• भंडारी खारवी समाज पतसंस्था

• मलकापूर अर्बन बँक

• खंडाळा अर्बन

• राजापूर कुणबी पतसंस्था

• बँक ऑफ इंडिया, राजापूर

• श्रमिक पतसंस्था, मिठगवाणे राजापूर

▶️पतसंस्था किवा बँकांनी कर्ज देताना पूर्ण खात्री करणे गरजेचे आहे. काही पतसंस्था व्यवहारात सुरक्षितता बाळगत नसल्याने फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. यासंदर्भात पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही बोलावण्यात आली आहे.
– धनंजय कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, रत्नागिरी.

🔹️अजून काहींचा समावेश

▪️दोन वर्षापासून हे चौघे एकमेकांच्या संपर्कात आहेत. यामध्ये काही स्थानिकांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. त्यांच्या मदतीने या चौघांनी जिल्ह्यात बस्तान मांडल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page