रत्नागिरी l 21 जून- नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या प्रशालेमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे ही इंग्रजी माध्यमाची प्रशाला चालवली जाते. येथे बारावीपर्यंतचे सर्व शिक्षण मोफत दिले जाते. आजच्या कार्यक्रमासाठी जनम संस्थानचे मुख्य विश्वस्त शांताराम दरडी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून झाली.
आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय योगादिनाची सुरूवात २०१५ मध्ये झाली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे अत्यंत मोठे महत्व आहे. ‘चित्तवृत्ती निरोध योग’ अशी योगाची व्याख्या केली आहे. माणसाच्या मनाला सध्या स्थिरतेची व एकाग्रतेची गरज असल्यामुळे योगाचे महत्त्व मानवाच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे. हे लक्षात घेऊन जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज इन्स्टिट्यूट नाणीज या प्रशालेच्या वतीने योगदिनाचे आयोजन केले होते. प्रशालेचे क्रीडा शिक्षक विशाल माने यांनी शासनाच्या मार्गदर्शक पुस्तिकेनुसार विद्यार्थ्यांकडून विविध योगासने करून घेतली. त्यांनी जीवनामध्ये योगाचे महत्व व आसनांचे महत्त्व प्रतिपादित केले.
प्रशालेचे सहाय्यक शिक्षक शुभम थोपटे यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व व योग ही परंपरा कुठून चालत आली याविषयी सविस्तर माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सहाय्यक शिक्षक रवींद्र लोंढे यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी पसायदान म्हटले. आभार नामदेव मोरे यांनी मानले.