मुंबई :- भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे. स्वदेशी बनावटीचे स्टेल्थ गाईडेड क्षेपणास्त्र नाशक ‘INS इंफाळ’ आज मंगळवारी भारतीय नौदलात दाखल झाली . आयएनएस इंफाळचे नौदलात कमिशनिंग मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे झाले. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
ही मेड इन इंडिया युद्धनौका विविध आधुनिक क्षेपणास्त्रे आणि तंत्रज्ञांनाने सुसज्ज आहे. यावरील ब्रह्मोस क्षेपणास्त्र ९० अंशात फिरुन शत्रूंवर हल्ला करू शकते. हिंद महासागरात चीनच्या हालचाली वाढल्या आहेत, अशा परिस्थितीत आयएनएस इंफाळ भारताची सागरी क्षमता मजबूत करेल, असा विश्वास संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आयएनएस इंफाळ ही पहिली युद्धनौका आहे, ज्याला ईशान्येतील एका शहराचे नाव(इंफाळ) देण्यात आले आहे.
अशी आहे INS इंफाळ
१६३ मीटर लांब, ७४०० टन वजनी आणि ७५ टक्के स्वदेशी वस्तुंद्वारे तयार केलेली आयएनएस इंफाळ भारतातील सर्वात शक्तिशाली युद्धनौकांपैकी एक आहे. ही समुद्रात ३० नॉट्सपेक्षा जास्त वेग गाठण्यास सक्षम आहे. याशिवाय, ही जमिनीवरुन जमिनीवर आणि जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रे आणि सेन्सर्सनी सुसज्ज आहे.
या युद्धनौकेला आधुनिक मॉनिटरींग रडार बसवण्यात आले आहे, ज्यामुळे तिचे लक्ष्य सहजपणे शोधण्यात मदत होते. ही युद्धनौका आण्विक, जैविक आणि रासायनिक (NBC) हल्ल्यांना तोंड देण्यास सक्षम आहे. या युद्धनौकेवर असलेल्या काही प्रमुख स्वदेशी शस्त्रांमध्ये टॉर्पेडो ट्यूब, अँटी-सबमरीन रॉकेट लाँचर्स, सुपर रॅपिड गन माऊंट, प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक पॉवर मॅनेजमेंट सिस्टमसारखे अनेक फीचर्स आहेत.
संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, BEL, L&T, गोदरेज, मरीन इलेक्ट्रिकल, BrahMos, Technico, Kineco, Jeet & Jeet, Sushma Marine, Techno Process सारख्या MSME ने मिळून ही शक्तिशाली युद्धनौका तयार केली आहे.