
नवी दिल्ली : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे जगभर पुन्हा महागाईचे सावट पडण्याची शक्यता आहे. जागतिक बँकेने दिलेल्या इशाऱ्यानुसार, हे युद्ध आणखी चिघळल्यास कच्च्या इंधनाची प्रतिबॅरेल किंमत १५० डॉलरवर जाण्याचे संकेत आहेत. कच्चे इंधन भडकल्यास त्याचा परिणाम भारतासह जगावरही होण्याची शक्यता आहे.
- जगभर पुन्हा महागाईचे सावट पडण्याची शक्यता आहे.
- जागतिक बँकेने कच्च्या इंधनाची प्रतिबॅरेल किंमत १५० डॉलरवर जाण्याचे संकेत दिले
- युद्ध आणखी ताणले गेल्यास त्याचा थेट परिणाम कच्च्या इंधनाचे दर भडकू शकतात
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाची धग कमी होते ना होते तोच इस्त्रायल आणि हमास यांच्यात ठिणगी पडली. या युद्धामुळे जगाचे अर्थकारण संकटात सापडण्याची शक्यता असल्याची भीती जागतिक बँकेने वर्तवली आहे. त्यामुळे आगामी काळात संपूर्ण जगाला महागाईचे चटके बसण्याची शक्यता आहे. कोविड नंतर आता कुठे भारतीय अर्थव्यवस्था सावरत असून, नव्याने बसणारे धक्के परवडणारे नाहीत, असे मत अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

तेल आणि गॅस पेटणार?
जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ इंदरमित गिल यांच्या मते इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे १९७०नंतर पश्चिम आशियातील कमॉडिटी मार्केटला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. या घटनेचा परिणाम जागतिक अर्थकारणावर होण्याची शक्यता आहे. धोरणकर्त्यांना धोरणांचा विचार करताना या घटनांकडे डोळ्यात तेल घालून पाहावे लागणार आहे. कारण, युद्धाचा थेट परिणाम कच्चे इंधन आणि नैसर्गिक वायूचे दर भडकण्यावर होण्याची शक्यता आहे. युरोपात नैसर्गिक वायूच्या किंमतीत यापूर्वीच वाढ झाली आहे. इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये गाझाजवळील वाहिनीचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
जागतिक बँकेच्या मते सध्या जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती समाधानकारक आहे. करोना आणि महागाईशी सामना केल्यानंतर अर्थव्यवस्था आता रूळावर येत आहे. अशा परिस्थितीत कच्च्या इंधनाच्या दराने उसळी घेतल्यास पुन्हा एकदा महागाई डोके वर काढण्याची शक्यता आहे. त्यातच कमॉडिटीच्या किमतीतही वाढ होण्याची भीती आहे. जगभर महागाई वाढल्यास त्याचा फटका सर्वच अर्थव्यवस्थांना बसून वृद्धीचा दर घटण्याची शक्यता आहे.
आगामी काळात खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्यास जगातील ७० कोटी लोक उपासमारीच्या गर्तेत सापडण्याची शक्यता आहे. – अयान कोसे, उपमुख्य अर्थतज्ज्ञ, जागतिक बँक