भारतीय फिरकीसमोर कांगारू गडबडले…!
नागपूर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी सामना नागपूर येथे खेळवण्यात आला. पहिल्या सामन्यातील तिसऱ्याच दिवशी भारताने जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीच्या जोरावर सामना १३२ धावांनी जिंकला. या विजयासोबतच भारताची या कसोटी मालिकेत विजयी सुरुवात झाली आहे.
९ फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय चुकीचा ठरवत अवघ्या १७७ धावांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सर्व फलंदाजांना तंबूत परत पाठवले. यानंतर भारताचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा टिचून सामना करत शतक झळकावले. यानंतर जवळपास ६ महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर संघात पुनरागमन करणारा डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि त्याचा दुसरा डावखुरा साथीदार अक्षर पटेलच यांनी साकारलेल्या चिवट अर्धशतकी खेळ्या आणि शेवटी मो. शमीच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने ४०० धावा करून सामन्यावर मजबूत पकड बनवली. भारताने सामन्यात तिसऱ्या दिवशी २२३ धावांची आघाडी मिळवत ऑस्ट्रेलियासमोर तगडे आव्हान ठेवले.
तिसऱ्या दिवशी भारताने दिलेलं आव्हान पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात आला परंतु भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे ते फार काळ टिकू शकले नाहीत. भारताच्या गोलंदाजीच्या दुसऱ्या डावात आर. अश्विनने ५ गडी आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ माघारी धाडला, तर रवींद्र जडेजा आणि मो. शमीने प्रत्येकी २ गडी आणि अक्षर पटेलने १ गडी बाद केला. अवघ्या ९१ धावांमध्ये कांगारूंचा संघ तंबूत परतला आणि भारताने तिसऱ्याच दिवशी गावसकर-बॉर्डर चषकातील पहिल्या सामन्यात विजयी सलामी दिली. या सामन्यात पहिल्या डावात ५ व दुसऱ्या डावात २ असे एकूण ७ बळी व ७० धावांची जबाबदार खेळी करणाऱ्या भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला.