अंडर-१९ विश्वचषक जिंकण्याचंही भारताचं स्वप्न भंगलं; ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा ७९ धावांनी पराभव…

Spread the love

बेनोनी- भारताच्या यंगिस्थान संघाने यंदा धडाकेबाज खेळ दाखवत अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एन्ट्री मारली. पण या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना युवा टीम इंडियाला फारशी किमया दाखवता आली नाही. अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २५४ धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया १७४ धावांवर गारद झाली. ऑस्ट्रेलियाने ७९ धावांनी धुव्वा उडवला. विश्वचषकात पराभव पत्करल्यानंतर अंडर-१९ विश्वचषक जिंकण्याचंही भारताचं स्वप्न भंगलं.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २५४ धावांचा पाठलाग करताना युवा टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. तिसऱ्या षटकातच टीम इंडियाला मोठा धक्का बसला. अर्शिन कुलकर्णी ६ चेंडूत ३ धावा करून बाद झाला. पहिल्या पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाला फारशी चमक दाखवता आली नाही. भारताने सुरुवातीच्या १० षटकात १ गडी गमावून २८ धावा कुटल्या. तर दुसरा धक्का मुशीर खानच्या रुपात बसला. मुशीरने ३३ चेंडूत २२ धावा कुटल्या. त्याने ३ चौकार लगावले. भारताला तिसरा मोठा धक्का कर्णधार उदय सहारनच्या रुपात बसला. उदयने १८ चेंडूत ८ धावा केल्या. उदय हा १७ व्या षटकात झेलबाद झाला. बीडच्या सचिन धसनेही कमाल दाखवली नाही. सचिनने ९ चेंडूत ८ धावा काढत बाद झाला. त्यात एक चौकाराचा समावेश आहे. २५ व्या षटकापर्यंत युवा टीम इंडियाचा निम्मा संघ माघारी परतला. प्रियांशु मोलिया २१ चेंडूत ९ धावा करून बाद झाला.

अरावेली अवनीशही शून्य धावांवर बाद झाला. अरावेलीच्या रुपाने सहावा गडी बाद झाल्याने टीम इंडिया तिथेच परभवाच्या छायेत गेली. त्यानंतर आदर्श सिंहच्या रुपात सातवा धक्का बसला. सलामीवीर आदर्श झेलबाद झाला. आदर्शने ७७ चेंडूत ४७ धावांची खेळी खेळली. त्यात ४ चौकार आणि १ षटकाराचा सामावेश आहे. भारताचा आठवा धक्का लिंबानीच्या रुपात बसला. लिंबानी शून्य धावांवर बाद झाला. पुढे दोन्ही गडी झटपट बाद झाले. टीम इंडियाचा संघ १७४ धावांवर गारद झाला.
अंडर-१९ विश्वचषकात टीम इंडियाला पराभूत करत चौथ्यांदा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. तर दुसरीकडे ऑस्टेलियाच्या सिनियर संघानेही आज वेस्ट इंडिजला पराभूत केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने आज दुहेरी आनंद साजरा केला. तर टीम इंडियाचा पराभव झाल्याने सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्याची संधी गमावली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page