भारत १४४ धावांनी आघाडीवर.
नागपूर- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १७७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने सात गडी गमावून ३२१ धावा केल्या. भारताकडे १४४ धावांची आघाडी आहे.
भारतीय संघाने क्रिकेटला एकापेक्षा एक खेळाडू दिले आहेत. त्यामध्ये रोहित शर्मा या दिग्गज खेळाडूचाही समावेश आहे. रोहित सध्या भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळतोय. ही जबाबदारी पार पाडत असताना तो संघाला विजय मिळवून देण्यासोबतच विक्रमांचा घाटही घालताना दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात रोहितने दमदार कामगिरी केलीये. त्यामुळे त्याच्यासाठी ‘लिडिंग फ्रॉम फ्रंट’ हा शब्दप्रयोग केला, तर अतिशयोक्ती ठरणार नाही. त्याने यादरम्यान एक शतक झळकावत एक खास विक्रम स्वत:च्या नावावर रचला आहे. कर्णधार म्हणून या कसोटीत शतक झळकावल्यानंतर त्याने बॅट उंचावून प्रेक्षकांना अभिवादन केले. यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी अशा तीनही प्रकारांत कर्णधार म्हणून शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाजठरला आहे.
ऑस्ट्रेलियाचा डाव १७७ धावांवर आटोपला होता. रोहित भारताकडून सलामीला फलंदाजीसाठी उतरला होता. तो दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रापर्यंत टिकला. मात्र, पॅट कमिन्सच्या ८१व्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याला बाद व्हावे लागले. यावेळी रोहितने २१२ चेंडूंचा सामना करत १२० धावा केल्या. या धावा त्याने २ षटकार आणि १५ चौकारांच्या मदतीने केल्या. शतक करताच रोहित विक्रमवीर बनला.