भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना मध्य प्रदेश येथील इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. भारताने हा सामना तब्बल ९० धावांनी जिंकत मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीवीरांनी झळकावलेल्या वेगवान शतकांच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकात ९ बाद ३८५ धावा धावफलकावर लावल्या.
टीम इंडियाने ठेवलेल्या डोंगराएवढ्या ३८६ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. हार्दिक पंड्याने फिन ॲलनला शून्यावर बाद केले. मात्र त्याचा साथीदार डेव्हॉन कॉनवेने भारतीय गोलंदाजांना चौकार-षटकार मारत अक्षरशः चोपून काढले. त्याचे एवढे धाडस झाले कारण टीम इंडियाचा यष्टीरक्षक इशान किशनने त्याच्या स्टंपिंगची चालून आलेली संधी गमावली. त्यावेळी तो ४७ चेंडूत ५७ धावांवर खेळत होता. किशनच्या एका चुकीमुळे टीम इंडिया इंदोरच्या सामन्यात संकटात सापडली होती. अखेर तो १३८ धावा करून तो बाद झाला, अन्यथा भारताला सामना जिंकणे अवघड होते तरीदेखील तब्बल ८१ धावांचा फटका भारताला बसला. ॲलन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही किवी फलंदाजाचा खेळपट्टीवर टिकाव न लागल्याने न्यूझीलंडचा डाव २९५ धावांवर आटोपला. आणि भारताचा एकतर्फी विजय झाला.