कांदा, बटाटा, टॉमॅटोच्या किंमतीत वाढ; भाज्यांचेही दर गगनाला; गृहिणींचं आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता..

Spread the love

मुंबई- सणासुदीचा काळ सुरू असतानाच गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु अचानक आलेल्या पावसामुळं शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. परिणामी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या शहरातील बाजारांमध्ये भाजीपाल्यांचे दर कडाकले आहे. पालेभाज्या, कांदा, बटाटा आणि टोमॅटोच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं आता सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार असून गृहिणींचं आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळं शेतातील भाजीपाल्यांचं मोठं नुकसान झालं आहे. याशिवाय कांदा, बटाटे, टॉमॅटो आणि पालेभाज्या बाजारात पोहचत नसल्याने या पदार्थांचा तुटवडा निर्माण होत आहे. आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांचे दर २० ते ३० टक्क्यांनी वाढल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली आहे. पुण्यासह नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये दररोज केवळ ६० ते ७० कांद्यांच्या गाड्या येत आहे. तसेच भाजीपाल्यांची आवकही झपाट्याने कमी होत असल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी होत असलेल्या पावसामुळं ही स्थिती निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.

बाजारात भाजीपाल्यांचे दर वाढल्याने ऐन गणेशोत्सवात सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागण्याची शक्यता आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांतील मुख्य बाजारपेठांमध्ये टोमॅटो, बटाटा आणि कांद्यासह भाजीपाल्यांच्या किंमतीत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. कांद्याला प्रतिकिलो ४० ते ५० रुपये, बटाटा ३० ते ४० रुपये आणि टोमॅटोला ४५ ते ६० रुपये मोजावे लागत आहे. मटार प्रतिकिलो ५० ते ६० रुपये, गवार ४० ते ५० रुपये, मिरची ४५ ते ५५ रुपये आणि भेंडी प्रतिकिलो ४० ते ६० रुपयांना मिळत आहे. पालेभाज्यांचे दर सरासरी ८० ते १०० रुपयांपर्यंत पोहचले आहे. गणेशोत्सवाच्या काळात भाज्यांचे दर सतत वाढणार असून गणेश विसर्जनानंतर भाज्या, कांदा, बटाटा आणि टोमॅटोचे दर कमी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page