
२३ ऑक्टोबर/पुणे– उच्च व तंत्रशिक्षण आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्टे, महिला सक्षमीकरण आणि उच्च शिक्षण’ या विषयावर आयोजित महिला सक्षमीकरण राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुल येथे आयोजित या कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.उज्वला चक्रदेव, शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, प्र.कुलगुरू डॉ.पराग काळकर, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महिलांना सक्षम करणे, बरोबरीचे स्थान मिळण्याची प्रक्रिया देशात पुढे जात आहे. जगातील अनेक देशात महिलांना मताधिकार मिळण्यासाठी संघर्ष करावा लागला असताना देशात स्वातंत्र्य मिळाल्याच्या पहिल्या दिवसापासून मताधिकार मिळाला आहे. महिलांना प्रसूती रजा, नोकरीच्या ठिकाणी पाळणाघर अशा सुविधा देण्यात येत आहेत. शिक्षणाच्या बाबतीतही महिलांना संघर्ष करावा लागला. परिषदेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थिनींची महाविद्यालयातील उपस्थिती वाढविण्याविषयी, त्यांचे शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधांविषयी चर्चा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे. घरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना तिला उत्पन्नाचे साधन मिळवून देणारे, आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे कौशल्य देण्याची व्यवस्था उभी करावी लागेल. तसेच महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘दामिनी पथक’ अधिक सक्षम करणे, महाविद्यालयात विद्यार्थिनींना आपले म्हणणे मांडण्याची व्यवस्था निर्माण करावी लागेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
शाश्वत विकासाच्यादृष्टीने २०२१ मध्ये जगातील मानवजातीच्या कल्याणासाठी १७ उद्दिष्टे मांडण्यात आली आहेत. त्यातील महिला सक्षमीकरण आणि उच्च शिक्षण या संदर्भातील संवाद या परिषदेत व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.