देवरूख- लहापणापासूनच विद्यार्थ्यामध्ये देशभक्ती निर्माण व्हावी यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ७५ फुट ध्वजस्तंभ फडकविण्यात आलाआहे. हा ध्वज मुलांच्या डोळ्यासमोर राहिल्यामुळे आपल्या देशाप्रती त्यांच्या मनात प्रेम राहील. या ध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. तिरंग्याचा अपमान हा माझा अपमान ही भावना प्रत्येकामध्ये असली पाहिजे असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी देवरूख येथे केले.
संगमेश्वर तालुक्यातील तहसिलदार कार्यालयातील ७५ फुट ध्वजस्तंभाचे लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसिलदार अमृता साबळे, माजी सैनिक अमर चाळके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी सैनिकांचा पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. माजी सैनिकांचा आदर्श सर्व विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. आज हे सैनिक आहेत म्हणुन आपण शांत झोप घेत आहोत असेही ना. सामंत यांनी सांगितले. यावेळी अमर चाळके, महेश सावंत, सुभाष मोरे , पांडुरंग शेडगे, सूर्यकांत पवार, यशवंत खरात, सुभाष शिंदे, शितल कदम, सुरेंद्र भोंदे या माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी केले तर आभार तहसिलदार अमृता साबळे यांनी मानले.