गडचिरोलीच्या जंगलात घातपात करण्याच्या तयारीत असलेल्या जहाल नक्षलवाद्यांची पोलीस दलातील सी 60 पथकाच्या जवानांसोबत चकमक उडाली. या चकमकीत सी 60 जवानांनी चार जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं.
गडचिरोली- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा डाव पोलिसांच्या सी 60 जवानांच्या पथकांनी हाणून पाडला. पोलीस जवानांनी चार जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. गडचिरोलीच्या जंगलात आज पहाटे चार वाजताच्या सुमारास ही मोहीम पोलीस जवानांनी फत्ते केली. हे जहाल नक्षलवादी तेलंगाणा राज्यातून प्राणहिता नदी ओलांडून घातपात घडवण्यासाठी महाराष्ट्रात दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तेलंगाणाच्या सीमेतून घुसखोरी…
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंसक कारवाया करण्याच्या उद्देशानं नक्षलवादी तयारी करत होते. त्यासाठी तेलंगाणा राज्य समितीच्या काही जहाल नक्षलवाद्यांनी तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेली प्राणहिता नदी ओलांडून गडचिरोली जिल्ह्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर अहेरी उपपोलीस मुख्यालयातून सी-60 आणि सीआरपीएफ, क्यूएटीची अनेक पथकं अतिरिक्त एसपी ऑपरेशन यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जंगलात रवाना करण्यात आले.
चार जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान….
पोलीस मदतकेंद्र रेपनपल्लीपासून पाच किमी अंतरावरील कोलामार्काच्या जंगलामध्ये आज पहाटे शोध सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचा शोध घेतला. यावेळी 4 नक्षलवाद्यांनी सी-60 दलांच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर सी-60 पथकानं जोरदार प्रत्युत्तर दिलं. गोळीबार थांबल्यानंतर आणि परिसराची झडती घेतल्यानंतर 4 जहाल नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलीस जवानांना सापडले आहेत.
मोठ्या प्रमाणात शस्त्र जप्त…
कोलामार्काच्या जंगलात गोळीबार झालेल्या ठिकाणी पोलिसांनी तपासणी केली. यावेळी घटनास्थळावरुन 1 एके 47, 1 कार्बाइन आणि 2 देशी बनावटीची पिस्तूल, नक्षलवादी साहित्य आणि सामान जप्त करण्यात आलं आहे.
36 लाखांचं बक्षीस असलेले नक्षलवादी ठार…
मृतांमधे डीव्हीसीएम वर्गेश, डिव्हीसीएम मगटू, कुरसंग राजू, कुडिमेट्टा व्यंकटेश यांचा समावेश आहे. त्यांच्यावर एकत्रितपणे महाराष्ट्र सरकारनं 36 लाखांचं रोख बक्षीस ठेवलं होतं. या घटनेमुळे परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आलं आहे.