
मुंबई : १ जून रोजी राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता आहे. कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतर उर्वरित भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांत १ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि विदर्भातील या जिल्ह्यांना हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
कोकणात पुढील २ दिवस अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईत १ जून रोजी सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मुंबईसह पालघर, ठाणे या दोन्ही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
१ जून रोजी पुण्यात मुख्यतः निरभ्र आकाश राहून दुपार किंवा सायंकाळनंतर हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पाऊस पडू शकतो. या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट जारी केलेला नाही .
छ्त्रपती संभाजीनगरमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलक्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर या सर्व जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
नाशिकमध्येही सामान्यतः ढगाळ आकाश राहून हलका पाऊस पडू शकतो. धुळे, नंदुरबार, जळगाव या तिन्ही जिल्ह्यांत सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पडण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये १ जून रोजी अंशतः ढगाळ आकाश राहून दुपार किंवा सायंकाळनंतर पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
अमरावती, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या चार जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतर उर्वरित जिल्ह्यांत कुठलीही पावसाची शक्यता नसल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. राज्यात संपूर्ण मे महिन्यानंतर जूनच्या सुरुवातीला पावसाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.