
*मुंबई-* महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग दाटून आले आहेत. राज्यभरात पुढचे पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. याशिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुढच्या काही दिवसांसाठी येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा अवकाळी पाऊस विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाटासह कोसळणार असल्याचा अंदाज आहे. यावेळी वादळी वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे. यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठीचे अलर्ट जारी केले आहेत. यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये गारपीटची देखील शक्यता आहे.
हवामान विभागाकडून ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 1 आणि 2 तारखेसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला 1 ते 3 एप्रिलपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग हा 30 ते 40 किमी प्रतितास असा असण्याची शक्यता आहे. तर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना उद्यासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जळगाव, नाशिक, नाशिक जिल्ह्यातील घाट परिसर, नगर या जिल्ह्यांना उद्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 2 एप्रिलसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, पुण्यातील घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांना 1 आणि 2 एप्रिल या दिवशी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला पुढच्या तीन दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सातारा जिल्ह्याला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्या आणि 3 एप्रिलसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्याला पुढचे तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बीड जिल्ह्याला 2 आणि 3 एप्रिलसाठी, नांदेड जिल्ह्याला 4 एप्रिलसाठी, लातूर आणि धाराशिव जिल्ह्याला 3 आणि 4 एप्रिलसाठी, अकोला-अमरावतीला पुढच्या दोन दिवसांसाठी, भंडारा जिल्ह्याला 2 ते 4 एप्रिलपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर बुलढाणा जिल्ह्याला 1, 2 एप्रिलसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या सर्वच ठिकाणी अवकाळा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.