
रत्नागिरी : शहरातील भगवती किल्ल्याजवळील पाण भुयार स्पॉट जवळ अज्ञात तरुणी खवळलेल्या समुद्रात पडून बेपत्ता झाली. ही तरुणी सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरुन पाण्यात पडली की, तिने समुद्रात उडी घेत आत्महत्या केली याबाबत माहिती मिळू शकलेली नसून ही घटना रविवार 29 जून रोजी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत रत्नदुर्ग माउंटेनियर्स आणि चिपळूणहून आलेल्या एनडीआरफचे पथक फिशरीजच्या दोन ड्रोन कॅमेर्यांच्या सहाय्याने बेपत्ता तरुणीचा शोध घेत होते.
रविवारी सुट्टी असल्याने भगवती किल्ल्याजवळ असलेली शिवसूष्टी पाहण्यासाठी स्थानिक तसेच बाहेरुन पर्यटक येत असतात. रविवारी दुपारीही या ठिकाणी अशीच पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यावेळी एक तरुणी पाणभुयार स्पॉटजवळ असलेल्या रेलिंगच्या पुढे जाउन सेल्फी काढण्यात गुंग होती. दरम्यान, सेल्फी काढता-काढता तिने आपले चप्पल आणि स्कार्फ बाजूलाच काढून ठेवले होते. यावेळी त्या तरुणीच्या आजूबाजूला अन्य काही पर्यटकही निसर्गाचा आनंद लुटत असताना काही क्षणात ती तरुणी अचानकपणे सुमारे 200 ते 250 फूट खोल समुद्राच्या पाण्यात पडलेली दिसून आली. आजूबाजूच्या पर्यटकांनी आरडा-ओरडा करताच त्या ठिकाणी एकच गर्दी झाली.
काहींनी शहर पोलिसांना याची माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. परंतू तत्पूर्वी ती तरुणी खवळलेल्या समुद्रात दिसेनाशी झाली होती. दरम्यान, रत्नदुर्ग माँटेनियर्स आणि एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तरुणीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतू सोसाट्याचा वारा आणि खळवलेला समुद्रामुळे त्या तरुणीचा शोध घेण्यात अडथळे निर्माण होत होते.
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी संबंधित अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर, शहर पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्याशी चर्चा करुन त्यांना भविष्यात अशाप्रकारच्या घटना त्याठिकाणी घडू नयेत, यासाठी काही उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच नागरिकांनी पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे. काही पर्यटक सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्यामुळे त्यांची एक चुकीची कृती मोठ्या अपघातास कारणीभूत ठरत आहे. असे ते म्हणाले.
पालकमंत्री यांची तात्काळ घटनास्थळाला भेट…
आज रत्नागिरीतील भगवती किल्ल्याजवळील सनसेट पॉईंट येथे एक मुलगी रेलिंगच्या बाहेर बसल्यामुळे खाली पडल्याची खळबळजनक माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ घटना स्थळी भेट दिली. घटनास्थळी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसाळ्याचे दिवस असून देखील धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे. मात्र काही पर्यटक सुरक्षेची पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. नागरिक आणि पर्यटकांना विनंती – आपल्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने कोणत्याही धोकादायक ठिकाणी जाणे टाळा. प्रशासनाच्या सूचना पाळा. असे आवाहन पालकमंत्री यांनी पर्यटक व नागरिकांना केले आहेत.
आपली एक चुकीची कृती मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकते! त्यामुळे आपला परिवाराचा विचार करून अशा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे असे यावेळी बोलताना पालकमंत्री यांनी सांगितले.