हवामान विभागानं महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
नवरात्रीच्या शेवटच्या काही रात्री गाजवणारा पाऊस आजची विजयादशमी साजरी करण्याच्या मूडमध्ये आहे. भारतीय हवामान खात्यानं देशातील १० राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातही कोकण किनारपट्टीसह काही जिल्ह्यांत पाऊस बरसणार आहे. त्यामुळं दसऱ्याचं सेलिब्रेशन आणि राज्यातील दसरा मेळावे कसे पार पडणार याविषयी साशंकता आहे.
भारतीय हवामान खात्यानं १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान १० राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये १२ ऑक्टोबर रोजी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आयएमडीचा अलर्ट काय?..
हवामान खात्याने १० ऑक्टोबरच्या हवामान बुलेटिनमध्ये या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार, १३ ऑक्टोबरपर्यंत कोकण, गोवा आणि गुजरात भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात १२ ऑक्टोबरपर्यंत तर सौराष्ट्र आणि कच्छमध्ये ११ ते १३ ऑक्टोबरदरम्यान पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात कशी असेल परिस्थिती?..
कोकण, गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यात आकाश ढगाळ राहील. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
दसरा मेळाव्यांचं काय होणार?…
दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रात वेगवेगळ्या मेळाव्यांची परंपरा आहे. विशेषत: राज्यातील राजकीय मेळावे हे सर्वांचं आकर्षण असतात. त्यातही शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा ही राजकीय परंपरा आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. त्याशिवाय, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाही मेळावा आहे. मराठवाड्यात पंकजा मुंडे त्यांच्या समर्थकांचा दसरा मेळावा घेणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे नागपूरमध्ये विजयादशमी मेळाव्यास संबोधित करतील. तर, मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मेळावा होणार आहे. या सर्व मेळाव्यांवर पावसाचं सावट आहे.